Coronavirus: गुड न्यूज! देशातील १५ राज्यातील २५ जिल्ह्यात मागील १४ दिवसात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 06:42 PM2020-04-13T18:42:30+5:302020-04-13T18:44:27+5:30
१४ दिवसानंतरही या २५ जिल्ह्यात कोरोना रुग्ण न आढळल्याने हे जिल्हे कोरोनाविरुद्ध लढाई जिंकले आहेत.
नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना लोकांना दिलासा देणारी बातमीही समोर आली आहे. देशात आतापर्यंत ९ हजार १५२ रुग्ण आढळले आहेत, ८५७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे ३०८ लोकांचा जीव गेला आहे. तर एका दिवसात १४१ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. देशभरातील १५ राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये मागील १४ दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. या २५ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. पण गेल्या १४ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नाही.
देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलं होतं. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहे. १४ दिवसानंतरही या २५ जिल्ह्यात कोरोना रुग्ण न आढळल्याने हे जिल्हे कोरोनाविरुद्ध लढाई जिंकले आहेत. यापुढेही या जिल्ह्यात नवीन रुग्ण आढळता कामा नये यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, जेव्हा या जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते तेव्हा जिल्हा प्रशासनाने कंटेनमेंट स्ट्रैटिजी धर्तीवर काम केले होते. ज्याचा चांगला परिणाम आता समोर आला आहे. पण आपल्याला यापुढेही अशाप्रकारचे ऊर्जेने काम करायला लागणार आहे. आगामी काळातही या जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्ण आढळणार नाही याची काळजी घेतली जाईल असं ते म्हणाले.
तसेच प्रत्येक अत्याधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. टाइमली रिस्पॉन्ससाठी कटिंग एज टेक्नोलॉजीचा वापर करणं गरजेचे आहे. आम्ही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लाईव्ह केस ट्रेकिंग, केस मॅनेजमेंट आणि कंटनेमेंट प्लान लागू करण्यासोबतच त्याच्यावर निरीक्षण ठेवण्याचंही काम केले असं लव अग्रवाल यांनी सांगितले.
या २५ जिल्ह्यात कर्नाटकातील ४, छत्तीसगड ३, केरळ २, बिहार ३, आणि हरियाणातील ३ जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच राज्यात एकूण ८८८ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. यातील २८५ रुग्ण बरे होऊन पुन्हा घरी परतले आहेत. तर पाच राज्यात मिळून १२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
उत्तराखंडमध्ये १०० तासात एकही रुग्ण नाही. ७ रुग्ण बरे झाले
उत्तराखंडमध्येही चांगली बातमी आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सांगितले की, मागील १०० तासात एकही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत ७ रुग्ण पूर्णपणे ठीक झाले आहेत. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी काही जिल्ह्यात अद्याप कर्फ्यू लावण्यात आला आहे.
या २५ जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही
गोंदिया-महाराष्ट्र
राजनांदगाव, दुर्ग आणि विलासपूर - छत्तीसगड
देवानगिरी, उडुपी, तुमकुरु आणि कोडगु - कर्नाटक
वायनाड आणि कोट्टायम - केरळ
वेस्ट इंफाल - मणिपूर
दक्षिण गोवा-गोवा
राजौरी - जम्मू-काश्मीर
आयझॉल वेस्ट-मिझोरम
माहे-पुडुचेरी
एसबीएस नगर-पंजाब
पटना, नालंदा, मुगर-बिहार
प्रतापगड - राजस्थान
पानीपत, रोहतक, सिरसा-हरियाणा
पौरी गढवाल - उत्तराखंड
भद्रद्री कोत्तागुडम - तेलंगणा