Coronavirus: दिलासादायक! गेल्या २४ तासात राजधानी दिल्लीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 11:01 AM2020-03-24T11:01:26+5:302020-03-24T11:05:08+5:30
दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत आतापर्यंत ३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे
नवी दिल्ली – जगभरात कोरोना व्हायरसने अनेक देशांना आपल्या विळख्यात ओढलं असताना भारतातही कोरोना रुग्णांची संख्या ५०० वर पोहचली आहे. आतापर्यंत १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच दिल्लीतून एक दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या 24 तासांत राजधानीत कोरोनाचा कोणताही नवीन रुग्ण आढळलेला नाही.
पहिल्या तीन दिवसांत दिल्लीत 16 जणांना कोरोनाची लागण झाली होती. अशा परिस्थितीत सोमवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तुटलेली पाहायला मिळाली. मात्र असं असलं तरी अद्यापही कोरोनाचा संक्रमणाचा धोका कायम आहे. पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणूनच डॉक्टर लोकांना घरामध्येच राहण्याचा सल्ला देत आहेत जेणेकरून संक्रमणाचा धोका कमी करता येईल.
दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत आतापर्यंत ३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. २० मार्च ते २२ मार्च या तीन दिवसात १६ रुग्णांची नोंद झाली. यातील ५ रुग्णांची तब्येत बरी झाली असून त्यांना घरी सोडण्यात आलं तर मागील दिवसात एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या सफदरजंग रुग्णालयात ११ रूग्ण दाखल आहेत. लोकनायक रुग्णालयात ६, राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 5 आणि जीटीबीमध्ये एक रुग्ण दाखल आहे.
इतर राज्यांची काय परिस्थिती?
कर्नाटकात 33 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात 30 लोक कोरोना संक्रमित आहेत. दिल्लीत 29 लोकांना याची बाधा झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 29 संक्रमित असून, एकाचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्येही 3 संक्रमित असून, एकाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात संक्रमितांची संख्या 97 असून, आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये 21 जण संक्रमित आढळले असून, एकाचा मृत्यू ओढवला आहे. पश्चिम बंगालमध्ये सात जणांना संसर्ग झालेला असून, एकाचा मृत्यू झाला आहे. या विषाणूला नियंत्रित करण्यासाठी सरकारनं काही निर्बंध लादले असून, त्याचे उल्लंघन करणार्यांवर केंद्र सरकारने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.