Coronavirus: कोरोना काळात प्राणवायू टंचाईमुळे मृत्यू झालेला नाही, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची सभागृहात माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 06:56 AM2022-04-06T06:56:50+5:302022-04-06T06:57:21+5:30
Coronavirus: आतापर्यंत कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात कोविड महामारी दरम्यान प्राणवायूच्या (ऑक्सिजन) टंचाईमुळे कोणाचा मृत्यू झाल्याला दुजोरा मिळालेला नाही, असे केंद्र सरकारने संसदेत सांगितले.
नवी दिल्ली : आतापर्यंत कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात कोविड महामारी दरम्यान प्राणवायूच्या (ऑक्सिजन) टंचाईमुळे कोणाचा मृत्यू झाल्याला दुजोरा मिळालेला नाही, असे केंद्र सरकारने संसदेत सांगितले.
आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी शून्यकाळात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना म्हटले की, केंद्र सरकार कोविड-१९ बाबत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडून नियमित पाठवल्या जाणाऱ्या अहवालाच्या आधारावर एकूण रुग्ण आणि विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी ठेवते.
डॉ. पवार म्हणाल्या की, केंद्र सरकारने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना अपेक्षित विवरण पाठवण्यास सांगितले आहे आणि २० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या उत्तरांनुसार कोणतेही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने प्राणवायूच्या टंचाईमुळे मृत्यू झाल्याला दुजोरा दिलेला नाही.
कोविडमुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून दिली जाईल, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारत पवार यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यासंदर्भात मूळ प्रश्न काँग्रेसचे नीरज डांगी यांनी विचारला होता. कोविडमुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली होती. परंतु, काही तासातच ही घोषणा मागे घेण्यात आली.
१२ वर्षांखालील मुलांचे लसीकरण
१२ वर्षांखालील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय शास्त्रीय अभ्यास व तज्ज्ञ समितीने निर्णय घेतल्यानंतर घेतला जाईल, असेही डॉ. पवार यांनी काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंग यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.
बुस्टरसाठी सक्ती नाही
कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर बुस्टर मात्रा घेण्याची सक्ती नसल्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात शिवसेनेचे अनिल देसाई यांनी पूरक प्रश्न विचारला होता.
कोरोनाचे ७९५ रुग्ण
देशात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ७९५ रुग्ण आढळले, तर ५८ जणांचा मृत्यू झाला. या ५८ मृत्यूत केरळमधील ५६ जणांचा समावेश आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.