Coronavirus: आठवड्यापासून दिल्लीत प्रतिबंधित क्षेत्रात वाढ नाहीच; आरोग्य यंत्रणेचे मोठे यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 01:05 AM2020-05-09T01:05:45+5:302020-05-09T01:06:02+5:30
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्लीतील सर्वच्या सर्व 11 जिल्हे रेड झोन श्रेणीत ठेवले. त्यामुळे आर्थिक व्यवहारांवर मर्यादा आल्या.
नवी दिल्ली : देशातील इतर महानगरांच्या तुलनेत दिल्लीने कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात का होईना रोखला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार नव्या भागात होत असल्याने रेड झोनची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. दिल्लीत मात्र दररोज नवे रुग्ण समोर येत असले तरी कंटेन्मेंट झोनची संख्या ८६ पेक्षा जास्त झाली नाही. आरोग्य यंत्रणेचे हे मोठे यश मानले जात आहे.
दिल्ली, मुंबईतील रुग्णसंख्या देशात सर्वाधिक आहे. मुंबईत तर बिकट अवस्था आहे. दिल्लीत तुलनेने रेड झोन वाढले नाहीत. एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात दिल्लीकरांना यश आले. मात्र, दररोज नवे रुग्ण समोर येत आहेत. गेल्या सात दिवसांमध्ये २ हजारांना लागण झाल्याचे टेस्टनंतर निष्पन्न झाले.
१४ एप्रिलपर्यंच दिल्लीत ५५ प्रतिबंधित क्षेत्रे (कंटेन्मेंट झोन) होती. झोनची संख्या त्या पुढच्या आठवड्यात दुप्पट झाली. १०० क्षेत्रांमध्ये साडेतीन हजारावंर रुग्ण होते. दिलशाद गार्डन, सीमापुरीमध्येच सर्वाधिक रुग्ण त्यावेळी होते. नंतर मात्र दिल्ली सकारने प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी पाहणी झाली. ताप, सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे असलेल्यांची माहिती घेण्यात आली. गल्लीबोळांत कोरोनाविरोधात युद्धाचाच संदेश गेला. गेल्या सात दिवसांमध्ये समोर आलेले दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आधी निश्चित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील असल्याने आरोग्य यंत्रणांचे मनोधैर्य वाढले आहे.
निर्बंध मात्र हटले जाणार नाहीत
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्लीतील सर्वच्या सर्व 11 जिल्हे रेड झोन श्रेणीत ठेवले. त्यामुळे आर्थिक व्यवहारांवर मर्यादा आल्या. मात्र, रेड झोन जिल्हे असले तरी जिल्ह्यांतर्गत नवी श्रेणी तयार करण्यात आली. प्रतिबंधित क्षेत्र, त्यात राहणाऱ्यांवर निर्बंध कठोर करण्यात आले. अशा क्षेत्रात 06 रुग्ण आढळले असले तरी निर्बंध वाढविण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्र वगळता नव्या भागात 08 दिवसांत कोरोना रुग्ण नाही. हीच स्थिती कायम ठेवण्यासाठी पुढचे ८ दिवस फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा लवकरच संपणार असला तरी निर्बंध मात्र हटले जाणार नाहीत.