coronavirus: ज्या रुग्णालयात ५० वर्षे म्हणून सेवा दिली तिथेच व्हेंटिलेटर मिळाला नाही, ज्येष्ठ डॉक्टराचा तडफडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 01:33 PM2021-04-26T13:33:08+5:302021-04-26T13:33:49+5:30
coronavirus In India : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. सर्वसामान्यच काय तर अनेक प्रसिद्ध व्यक्तींनाही रुग्णसेवा मिळणे कठीण झाले आहे.
प्रयागराज (उत्तर प्रदेश) - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. सर्वसामान्यच काय तर अनेक प्रसिद्ध व्यक्तींनाही रुग्णसेवा मिळणे कठीण झाले आहे. अशीच धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमधून समोर आली आहे. येथील प्रसिद्ध डॉक्टर जे.के.मिश्रा यांचा कोरोनाच्या संसर्गानंतर व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृ्त्यू झाला आहे.
दुर्दैवाची बाब म्हणजे डॉ. जे.के मिश्रा यांनी ज्या रुग्णालयात सुमारे ५० वर्षे सेवा दिली. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना, डॉक्टरांना शिकवले. त्याच रुग्णालयात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर व्हेंटिलेटर मिळाला नाही. कोरोनामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. अनेक प्रयत्नांनंतरही त्यांना व्हेटिलेटर मिळू शकला नाही. शेवटी त्यांनी त्यांच्या कोरोनाबाधित पत्नीसमोरच अखेरचा श्वास घेतला.
स्वरूप राणी रुग्णालय हे प्रयागराजमधील सर्वात मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये ८५ वर्षीय डॉ. जे.के. मिश्रा यांनी आपल्या जीवनाची ५० वर्षे सेवा दिली होती. मात्र १६ एपिरल रोजी कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांना उपचार मिळवण्यासाठी कुटुंबीयांना बरीच धावपळ करावी लागली.
डॉ. मिश्रा यांची पत्नी डॉ. रमा मिश्रा यांनी सांगितले की, १३ एप्रिल रोजी त्यांच्या ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागली होती. त्यानंतर १६ एप्रिल रोजी जे.के. मिश्रा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांची प्रकृती अधिकाधिक बिघडत गेली. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा सल्ला दिला. मात्र व्हेंटिलेटरची व्यवस्था होऊ शकली नाही. अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली.