coronavirus: मुंबई नाही आता या शहरात वाढतोय कोरोनाचा संसर्ग, तीन दिवसांत सापडले पाच हजार रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 04:44 PM2020-06-05T16:44:43+5:302020-06-05T17:42:06+5:30
आता देशाच्या आर्थिक राजधानीपेक्षा राजकीय राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढू लागला आहे. गेल्या तीन दिवसांत दिल्लीमध्ये कोरोनाचे सुमारे पाच हजार रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नवे रुग्ण सापडण्याच्याबाबतीत दिल्लीने मुंबईला मागे टाकले आहे.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची सध्या बिकट अवस्था झाली आहे. सुमारे सव्वा दोन महिने चाललेल्या लॉकडाऊननंतरही मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या घटलेली नाही. मात्र आता देशाच्या आर्थिक राजधानीपेक्षा राजकीय राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढू लागला आहे. गेल्या तीन दिवसांत दिल्लीमध्ये कोरोनाचे सुमारे पाच हजार रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नवे रुग्ण सापडण्याच्याबाबतीत दिल्लीने मुंबईला मागे टाकले आहे. तसेच देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या राज्यांच्या यादीत दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे २५ हजार ४ रुग्ण सापडले आहेत. पैकी ९ हजार ८९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिल्लीत आतापर्यंत ६५० जणांचा मृत्यू झाला आहे. २८ मे नंतर दिल्लीत कोरोनाच्या रुग्णवाढीचा विस्फोट झाला असून, दररोज सरासरी एक हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. तीन जून रोजी दिल्लीत तब्बल १५१३ नवे रुग्ण सापडले होते. दोन महिन्यांनंतर प्रथमच दिल्लीमध्ये मुंबईपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. तीन जून रोजी मुंबईत १२७६ नवे रुग्ण सापडले होते.
सध्या दिल्लीमध्ये कोरोनाचे १४ हजार ४५६ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात ३३ हजार ६८१ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर गुजरातमध्ये कोरोनाचे ४ हजार ७६२ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
coronavirus: चिंताजनक! कोरोनाचा ग्रामीण भागातही फैलाव; काही राज्यांत शहरांपेक्षा गावात अधिक रुग्ण
२६ व्या वर्षी खासदार, ४५ व्या वर्षी मुख्यमंत्री! अशी आहे योगी आदित्यनाथ यांची कारकीर्द
कोरोना आला, वादळ झाले, आता आकाशातून पृथ्वीवर येणार तिहेरी संकट
coronavirus: कोरोनामुळे तिजोरीत खडखडाट; मोदी सरकारकडून नव्या योजनांना मार्च २०२१ पर्यंत स्थगिती
लॉकडाऊन चारमध्ये सूट मिळाल्यानंतर दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या काळात मुंबई आणि अहमदाबादमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढलेली नाही. दरम्यान, कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात आल्याने अधिक रुग्ण सापडत असल्याचा दावा दिल्ली सरकारकडून करण्यात येत आहे. तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिल्लीतील कंटेन्मेंट झोनची संख्याही वाढून १६३ झाली आहे.