CoronaVirus News: जगाच्या तुलनेत भारतात रुग्ण, मृतांची संख्या कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 05:12 AM2020-10-04T05:12:41+5:302020-10-04T06:53:03+5:30
बळींचे प्रमाण घटले; स्थितीतही काहीशी सुधारणा
नवी दिल्ली : जागतिक पातळीच्या तुलनेत भारतामध्ये कोरोना रुग्ण तसेच या आजाराला बळी पडलेल्यांचे प्रमाण (केस फॅटिलिटी रेट - सीएफआर) कमी आहे. गेल्या पाच महिन्यांत भारतातील सीएफआर पहिल्यांदाच २.५ टक्क्यांपेक्षा कमी झाला.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावरील सीएफआर १८ जुलै रोजी ३.४१ टक्के होता. देशात १२ मार्च रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला. त्यावेळेपासून मे महिन्याच्या मध्याला ३.२३ टक्के इतका सर्वात जास्त सीएफआर नोंदविला गेला. त्यानंतर भारताचा सीएफआर दर हा २.८ टक्क्यांच्या आसपासच होता.
देशात कोरोना रुग्ण शोधण्यासाठी वेगाने सुरू केलेल्या हालचाली, चाचण्यांची वाढविलेली संख्या व उपचारविषयक सोयीसुविधा वेळीच उपलब्ध करून दिल्याने सीएफआरचे प्रमाण कमी झाले. देशातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण कमी राखण्यात यश आले असून सध्या २.४९ टक्के इतका सीएफआर आहे. जगातील सर्वात कमी सीएफआर भारताचा आहे.
काही राज्ये कोरोनाचा यशस्वीरितीने मुकाबला करत असून तिथे या आजारामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामध्ये मणिपूर, नागालँड, सिक्कीम ही राज्ये व अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे.
१४ राज्यांचा दर १ टक्क्यांहून कमी: २९ राज्यांतील सीएफआर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. तर १४ राज्यांचा सीएफआर हा १ टक्क्यांहून कमी आहे. कोरोनाच्या आजारातून भारतात जास्तीत जास्त लोक बरे होत असून मृत्यूचे प्रमाण घटले.
राज्ये आणि सीएफआरचे प्रमाण : त्रिपुरा (०.१९ टक्के), आसाम (०.२३ टक्के), केरळ (०.३४ टक्के), ओदिशा (०.५१ टक्के), गोवा (०.६० टक्के), हिमाचल प्रदेश (०.७५ टक्के), बिहार (०.८३ टक्के), तेलंगणा (०.९३ टक्के), आंध्र प्रदेश (१.३१ टक्के), तामिळनाडू (१.४५ टक्के), चंदीगढ (१.७१ टक्के), राजस्थान (१.९४ टक्के), कर्नाटक (२.८ टक्के), उत्तर प्रदेश (२.३६ टक्के) या राज्यांचा समावेश होतो.