CoronaVirus News: देशात रुग्णांची संख्या ३ लाख ४३ हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 03:13 AM2020-06-17T03:13:30+5:302020-06-17T06:54:32+5:30
१ लाख ८0 हजार झाले बरे; २४ तासांत १0 हजार नवे रुग्ण
नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशाच्या विविध भागांत कोरोनाचे १0 हजार ६६७ नवे रुग्ण आढळल्याने आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ३ लाख ४३ हजार ९१ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत या आजाराने ३८0 जणांचा बळी घेतला. त्यामुळे आतापर्यंतच्या मृत्यूंचा आकडा ९९00 पर्यंत जाऊ न पोहोचला आहे.
एकीकडे देशात रुग्णांची संख्या वाढत असली तरी ते बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत १ लाख ८0 हजार रुग्ण बरे झाले आहेत आणि सध्या १ लाख ५३ हजार १७६ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली. सोमवारी दिलेल्या आकडेवारीत रुग्णांच्या संख्येत ११ हजारांनी भर पडली होती. पण आजची माहिती पाहता, नव्या रुग्णांची संख्या काहीशी कमी झाली आहे. तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये नव्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचा हा परिणाम आहे.
महाराष्ट्रात मात्र गेल्या २४ तासांत २ हजार ७८६ नवे रुग्ण आढळले. तामिळनाडूमध्ये हा आकडा १८00 आणि दिल्लीमध्ये १५४७ इतका आहे. तामिळनाडूतील एकूण रुग्णांची संख्या आता ४६ हजार ५0४ झाली आहे आणि दिल्लीत ती ४२ हजार ८२८ आहे. गुजरातमध्ये २४ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयातील ८0 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या चारही राज्यांत एकूण रुग्णांची संख्या १० हजारांहून अधिक आहे. सर्वाधिक म्हणजे १ लाख १० हजार ७४४ रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. पण महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जवळपास ५० टक्क्यांच्या आसपास आहे.
सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, दादरा-नगरहवेली, मेघालय, अंदमान-निकोबार आणि या पाच राज्ये वा केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५० ते ७० च्या आसपास आहे. गोव्यात गेल्या आठवड्यापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळून आले नव्हते. पण आता तिथे एकूण रुग्णांचा आकडा ५९२ झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली.
दिल्लीत चिंता
दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांतील रुग्णांची संख्या तुलनेने कमी असली तरी ती झपाट्याने वाढत जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दिल्ली व केंद्र सरकार अतिशय चिंतेत आहे. दिल्लीत मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या घेण्यात याव्यात, अशी शिफारस आयसीएमआरने केंद्र सरकारला केली आहे.