CoronaVirus News: आयआयटी मद्रासमधील कोरोनाबाधितांची संख्या १९१
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 03:10 AM2020-12-17T03:10:14+5:302020-12-17T03:10:59+5:30
तामिळनाडूत सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची होणार चाचणी
चेन्नई : आयआयटी मद्रास येथे आणखी आठ विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाले असून, आता तेथील बाधितांची संख्या १९१वर पोहोचली आहे. त्यामुळे आता दक्षतेचा उपाय म्हणून तामिळनाडूतल्या सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे.
आयआयटी मद्रासमध्ये या आठवड्यात अचानक कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. मंगळवारी केलेल्या चाचणीत तिथे १४१ रुग्ण सापडले होते. त्यानंतर कॅम्पसमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलेले आहे.
अण्णा विद्यापीठातही सहा विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे तामिळनाडूचे गृह सचिव आर. राधाकृष्णन यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर आयआयटी मद्रासमधील विविध विभाग, केंद्रे, प्रयोगशाळा, ग्रंथालय बंद ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत आयआयटी मद्रासमधील हजार विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
घरातूनच काम करण्याच्या सूचना
आयआयटी मद्रासमधील वसतिगृहाच्या खानावळीतील लोकांकडून कोरोना संसर्गाचा प्रसार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना आता पाकीटबंद जेवण व खाद्यपदार्थ दिले जात आहेत.
आयआयटी मद्रासमधील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी घरातूनच काम करावे, असे सांगण्यात आले आहे. याआधी तामिळनाडू सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर राज्यातील महाविद्यालयांनी पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू केले होते.