Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 168 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 05:28 AM2020-03-19T05:28:40+5:302020-03-19T05:28:58+5:30
देशामधील कोरोना रुग्णांची संख्या १68 झाली असून, त्यामध्ये अनेक विदेशी नागरिकांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : भारतीय लष्करामध्ये करोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला आहे. लडाख स्काउट रेजिमेंटमधील एक लष्करी जवान (३४ वर्षे) कोरोनाग्रस्त झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. विविध राज्यांत कोरोनाचे १० नवे रुग्ण आढळले असून, त्यामुळे देशात विषाणूचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या बुधवारी 168 वर पोहोचली आहे. बुधवारी रात्री तेलंगणामध्ये 7 जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, एका कोरोनाबाधिताने नवी दिल्लीत आत्महत्या केली आहे.
करोनाग्रस्त झालेला लष्करी जवान लेहमधील चुहोट गावचा रहिवासी आहे. त्याचे वडील इराणच्या यात्रेहून २० फेब्रुवारीला भारतात परतले होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले. लडाख हार्ट फाउडेशनच्या क्वारंटाइनमध्ये हलविण्याआधी ते आपल्या कुटुंबीयांना भेटले होते. त्यावेळी या जवानालाही वडिलांकडून कोरोनाचा संसर्ग झाला. हा जवान २५ फेब्रुवारीपासून रजेवर होता. तो २ मार्च रोजी कामावर रुजू झाला. या जवानाला ७ मार्च रोजी क्वारंटाइनमध्ये दाखल करण्यात आले. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे १६ मार्च रोजी वैद्यकीय तपासणीतून सिद्ध झाले.
देशामधील कोरोना रुग्णांची संख्या १68 झाली असून, त्यामध्ये 31 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. या साथीने देशात ३ जणांचा बळी घेतला असून, त्यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटकमधील कोरोनाच्या रुग्णांचा समावेश आहे. बंगळुरूमध्ये कोरोनाचे आणखी दोन नवे रुग्ण आढळून आले असून, त्यामुळे कर्नाटकातील अशा प्रकारच्या रुग्णांची एकूण संख्या १३ झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी दिली.
नॉर्वेचा गोव्यातील नागरिक करोनाग्रस्त नाही
नॉर्वे देशातील एक नागरिक गोव्यात आला असून, त्याला कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे वैद्यकीय चाचणीत आढळून आले आहे, असे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी बुधवारी सांगितले.
या नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचा दूरध्वनी एका माणसाने केला. रक्ताचे नमुने तपासण्यासाठी दिलेल्या प्रयोगशाळेतून बोलत असल्याची बतावणी हा दूरध्वनी करणाऱ्याने केली होती. गोव्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
कोरोनाच्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी काही खाटा राखीव ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांना दिले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नावांची व्यवस्थित नोंद ठेवण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत.