coronavirus: देशात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६ लाखांहून कमी, बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९१.१५ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 04:32 AM2020-10-31T04:32:52+5:302020-10-31T07:28:24+5:30
Coronavirus in India News : केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५० टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१५ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६ लाखांहून कमी झाली आहे. शुक्रवारी ४८,६४८ नवे कोरोना रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या ८० लाख ८८ हजार झाली आहे. या संसर्गातून ७३ लाख ७३ हजारांहून अधिक जण बरे झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५० टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८०,८८,८५१, तर बरे झालेल्यांची संख्या ७३,७३,३७५ झाली आहे. या आजाराने आणखी ५६३ जण शुक्रवारी मरण पावले असून, बळींचा एकूण आकडा १,२१,०९० झाला आहे. उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी ५,९४,३८६ होती. गुरुवारपेक्षा ती ९३०१ने कमी झाली आहे. उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ७.३५ टक्के आहे.
जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशात अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. तिथे ९२ लाख १२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतामधील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा ११ लाखांहून कमी आहे.
देशात झाल्या १० कोटी ७७ लाख कोरोना चाचण्या झाल्या.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार २९ ऑक्टोबर रोजी ११,६४,६४८ कोरोना चाचण्या पार पडल्या. देशात आतापर्यंत करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या १०,७७,२८,०८८ झाली आहे.
तिसऱ्या क्रमांकावरील ब्राझीलमध्ये ५४ लाख ९६ हजारांहून अधिक रुग्ण आहेत.