coronavirus : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 28 हजारांजवळ, 24 तासांत 48 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 10:40 AM2020-04-27T10:40:15+5:302020-04-27T11:06:23+5:30
आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासात एकूण 1396 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीचा वेग कायम असून, गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाच्या 1396 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर याच काळात 48 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 381 जणांनी कोरोनाला मात दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासात एकूण 1396 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 27 हजार 892 पर्यंत पोहोचला आहे. तसेच दिवसभरात 48 जणांचा मृत्यू झाला असून, देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 872 झाला आहेत. दिलासादायक बाब म्हणजे याच काळात 381 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा 6 हजार 185 झाला आहे. त्यामुळे कोरोनाला मात देत बऱ्या झालेल्या रुग्णांची टक्केवारी 22.17 झाली आहे.
दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता या लॉकडाऊनचा कालावधी वाढवायचा की नाही याबाबत आज पंतप्रधान मोदी आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे. देशातील लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदतसह परप्रांतीय मजुरांना माघारी पाठवण्याच्या मागवण्याच्या मागण्या केल्या जाऊ शकतात. याशिवाय उद्योगांनादेखील दिलासा देण्याची मागणीदेखील केली जाऊ शकते.
पंतप्रधान कार्यालयातल्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडून राज्यांमधल्या स्थितीचा आढावा घेतील. देशात लागू असलेला लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं उठवण्याचा केंद्राचा विचार आहे. त्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा होईल. राज्यांच्या विविध मागण्या या बैठकीत ऐकल्या जातील. तर मोदी मुख्यमंत्र्यांसोबत रेल्वेची सेवा सुरू करण्यासह मजुरांच्या पलायनाच्या विषयावर चर्चा करतील. यासोबतच उद्योग पुन्हा सेवा करण्याबद्दल, रुग्णालयातल्या सुविधांविषयी मुख्यमंत्र्यांची मतं जाणून घेतील.