Coronavirus: देशात रुग्णांची संख्या साडेपाच लाखांकडे; मृत्युदर मात्र कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 03:46 AM2020-06-30T03:46:22+5:302020-06-30T03:46:32+5:30
एका दिवसात वाढले १९ हजार ४५९ रुग्ण
नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांची संख्या १९ हजार ४५९ ने वाढल्यामुळे देशात आतापर्यंतच्या रुग्णांचा आकडा आता ५ लाख ४८ हजार ३१८ झाला आहे. तसेच मृतांच्या संख्येत ३८० ची भर पडून मरण पावलेल्यांची संख्या १६ हजार ४७५ पर्यंत गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत रोज १८ हजार वा त्याहून अधिक भर पडत असून, या वेगामुळे पुढील तीन दिवसांत देशात कोरोनाबाधितांचा आकडा ६ लाखांवर गेलेला असेल, असा अंदाज आहे.
जगातील रुग्णांची संख्या १ कोटी २६ लाखांच्या वर गेली असून, मृतांचा आकडा ५ लाखांच्या वर गेला आहे. सर्वाधिक म्हणजे २६ लाख ३७ हजार रुग्ण एकट्या अमेरिकेत असून, तिथे मृतांचा आकडा १ लाख २९ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये १३ लाख ४५ हजार रुग्ण असून, मृतांची संख्या तिथे ५७ हजार आहे. रशियामध्येही आता रुग्णसंख्या ६ लाख ४१ हजारांवर गेली आहे. तिथे मृतांची संख्या ९ हजारांहून काहीशी अधिक आहे.
रुग्णांच्या बाबतीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. ब्रिटन, इटली, स्पेन, फ्रान्स, मेक्सिको या देशांत रुग्णांची संख्या भारतापेक्षा खूप कमी असली तरी तिथे मृतांची संख्या २५ ते ४८ हजारांच्या आसपास आहे. भारताचा मृत्युदर जगात बराच कमी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही देशात अधिक आहे. आतापर्यंत ३ लाख २१ हजार ७२२ रुग्ण बरे झाले असून, सध्या २ लाख १० हजार १२१ जणांवर उपचार सुरू आहेत. म्हणजेच बरे होण्याचे प्रमाण देशात ५८६७ टक्के आहे.
देशात सर्वाधिक म्हणजे १ लाख ६४ हजार ६२६ रुग्ण महाराष्ट्रात असून, दिल्लीमध्ये ८३ हजार ७७, तर तमिळनाडूमध्ये ८२ हजार २७५ रुग्ण आहेत. या तीन राज्यांत आतापर्यंत अनुक्रमे ७ हजार ४२९, २६२३ व १0७९ रुग्ण मरण पावले आहेत. गुजरातमध्ये रुग्णांची संख्या ३१ हजार ३२० रुग्ण असून, तिथे मरण पावलेल्यांची संख्या आता १८०८ झाली आहे. रुग्णांच्या तुलनेत मरण पावणाऱ्यांचे प्रमाण सध्या गुजरातमध्ये अधिक आहे.
८४ लाख नमुने तपासले
रुग्णांचे प्रमाण वाढत असले, तर देशभर कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत १ लाख ७0 हजार ५६0 नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत ८३ लाख ९८ हजार ३६२ नमुने तपासण्यात आल्याची माहिती आयसीएमआरतर्फे देण्यात आली.