Coronavirus: भारतातील रुग्णांची संख्या ३१५३ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 01:27 AM2020-04-04T01:27:09+5:302020-04-04T06:34:43+5:30
गेल्या दोन दिवसांत १४ राज्यांत एकदम ६४७ रुग्ण आढळले.
नवी दिल्ली: गेल्या चोवीस तासांत भारतात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ३१५३ वर पोहोचली आहे; तर, आतापर्यंत ८४ जणांचा मृत्यू झाला असून २२९ जण उपचारांनंतर बरे झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह-सचिव लव अग्रवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या दोन दिवसांत १४ राज्यांत एकदम ६४७ रुग्ण आढळले; तथापि, हे सर्व दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाशी संबंधित आहेत. लॉकाडाऊन, सोशल डिस्टन्सिंगच्या उपायांमुळे रुग्णांच्या संख्येत एकदम वाढत होताना दिसत नाही. तेव्हा या संसर्गजन्य रोगाचा मुकाबला करून ही साथ थोपविण्यासाठी या उपायांचे काटेकोरपणे पालन करणे जरुरी आहे, हे प्रत्येकाने ध्यानात घ्यावे. याचे पालन करण्यात एखादी किरकोळ चूक झाल्यास आपले सर्व प्रयत्न व्यर्थ जातील.
गृहमंत्रालयाच्या सह-सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या विदेशी लोकांविरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती दिली. त्यांचे पासपोर्ट काळ्या यादीत टाकले जात आहेत. ज्यांचे पासपोर्ट काळ्या यादीत टाकण्यात आले आहेत, त्यापैकी ९६० जण अजूनही भारतात असून उर्वरित ३६० मायदेशी परतले आहेत. देशातील प्रयोगशाळांची संख्या वाढविल्याने १८२ झाली असून यापैकी १३० सरकारी आहेत.