CoronaVirus News: दिलासादायक! कोरोनाचे बरे होणारे रुग्ण वाढताहेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 03:56 AM2020-10-07T03:56:46+5:302020-10-07T06:41:32+5:30
CoronaVirus News: २५ जिल्ह्यांत सर्वात जास्त मृत्यू; त्यातील १५ जिल्हे महाराष्ट्रातील
नवी दिल्ली : गेल्या २ आठवड्यांत कोरोनाचे सक्रिय रुग्ण १० लाखांपेक्षा कमी असून रुग्ण बरे होण्याची टक्केवारीही ८४ टक्क्यांपेक्षाही जास्त झाली, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी येथे सांगितले.
प्रसारमाध्यमांना माहिती देताना ते म्हणाले की, देशात कोरोनाचे ७७ टक्के सक्रिय रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशसह दहा राज्यांत आहेत.
राजेश भूषण म्हणाले की, ‘‘कोरोना विषाणूमुळे होणारे मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य मंत्रालय संबंधित राज्यांशी बोलत आहे. आमचे लक्ष्य ते प्रमाण एक टक्क्याच्या खाली आणण्याचे आहे.’’
देशात आतापर्यंत ५६ लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. भारत जगात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण बरे होणारा देश बनला आहे. गेल्या एका आठवड्यात आठ लाखांपेक्षा जास्त कोरोनाच्या चाचण्या केल्या गेल्या. आतापर्यंत ८ कोटींपेक्षा जास्त कोरोना चाचण्या झाल्या आहेत.
आकडेवारीवरून सांगणे अवघड
राजेश भूषण म्हणाले की, कोरोनाचे रुग्ण वाढीचे टोक गाठले गेले का याबद्दल सांगायचे तर आकड्यांवरून काही भाष्य करणे योग्य नाही. आताचे हवामान चिकनगुनिया, डेंगू आणि मलेरियाच्या आजारांचे आहे. राज्यांना जे दिशा-निर्देश दिले गेले त्यांचे पालन त्यांनी कठोरपणे करावे. केरळमध्ये ओणम सणामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे सणांच्या दिवसांत जास्त काळजी घेतली जावी.