CoronaVirus: चिंताजनक! देशात बाधितांची संख्या ४ लाख ७३ हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 04:10 AM2020-06-26T04:10:54+5:302020-06-26T04:11:34+5:30
आतापर्यंत महाराष्ट्रात १ लाख ४२ हजार ९00 रुग्ण आढळले असून, दिल्लीत ही संख्या ७0 हजार ३९0, तमिळनाडूमध्ये ६७ हजार ४६८ तर गुजरातमध्ये २८ हजार ९४३ आहे.
नवी दिल्ली : भारतातील कोरोना रुग्णांची संख्या गुरुवारी सकाळी ४ लाख ७३ हजारांवर गेली असून, सध्याचा रुग्णवाढीचा वेग पाहता, शनिवारी हा आकडा ५ लाखांपर्यंत गेलेला असेल, असे दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात १५ हजार ९८६ म्हणजे सुमारे १६ हजार रुग्णांची भर पडली आहे.
देशात २0 जूनपासून रोज १४ हजारांहून अधिक रुग्ण आढळल्याने अवघ्या ६ दिवसांतच रुग्णांचा आकडा ९0 हजारांनी वाढला आहे. गेल्या २४ तासांत आढळलेले रुग्ण आतापर्यंत सर्वाधिक आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात १ लाख ४२ हजार ९00 रुग्ण आढळले असून, दिल्लीत ही संख्या ७0 हजार ३९0, तमिळनाडूमध्ये ६७ हजार ४६८ तर गुजरातमध्ये २८ हजार ९४३ आहे.
मात्र शहरांचा विचार करता मुंबईच्या तुलनेत दिल्लीत अधिक रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार : २४ तासांत ४१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंतची मृतांची संख्या १४ हजार ८९४ झाली आहे. त्यापैकी ७0 टक्के रुग्णांना अन्य व्याधी होत्या. महाराष्ट्रात आतापर्यंत ६७३९ मृत्यू झाले आहेत. अरुणाचल प्रदेशात २४ तासांत एक जण मरण पावला. त्या राज्यातील कोरोनाचा तो पहिला बळी आहे. ज्या राज्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या १0 हजारांहून अधिक आहे, त्यात हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेश व कर्नाटक यांचा समावेश आहे, तर उत्तरप्रदेश, राजस्थान, प.बंगाल, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये रुग्णांची संख्या १५ हजारांहून अधिक आहे.
>बरे होण्याचे प्रमाण वाढले
देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून आता ५७.४३% झाले आहे. आतापर्यंत २ लाख ७६ हजार ६९६ रुग्ण बरे झाले असून, सध्या १ लाख ८६ हजार ५१४ रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या चाचण्यांमध्ये वेगाने वाढ होत असून, आतापर्यंत देशात ७५ लाख ५0 हजार ७८२ नमुने तपासण्यात आले. बुधवारी एका दिवसात २ लाख ७ हजार ८७१ चाचण्या घेण्यात आल्या.