Coronavirus: दिलासादायक! सलग ९ दिवस बळींची संख्या हजाराखाली; रुग्णवाढीचा आकडाही उतरणीला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 11:45 PM2020-10-12T23:45:27+5:302020-10-13T06:57:16+5:30
एकूण रुग्णसंख्या ७१ लाखांवर; बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ८६ टक्के
नवी दिल्ली : देशामध्ये दररोजच्या रुग्णवाढीचा आकडा उतरणीला लागला असून, गेल्या सलग नऊ दिवसांपासून कोरोना बळींची संख्याही एक हजारहून कमी आहे. सोमवारी कोरोनाचे ६६,७३२ नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णांची संख्या ७१ लाखांवर पोहोचली आहे. तर ६१ लाख लोक या आजारातून बरे झाले असून त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ८६.३६ टक्के आहे.
रविवारी कोरोनामुळे ९१८ जण मरण पावले होते. सोमवारी हाच आकडा ८१६ इतका आहे. त्यामुळे कोरोना बळींची संख्या आता १,०९,१५० वर पोहोचली आहे. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७१,२०,५३८ आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार ८,६१,८५३ कोरोना रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या १२.१० टक्के आहे. सलग चौथ्या दिवशी या रुग्णांची संख्या ९ लाखांपेक्षा कमी आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५३ इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. रविवारी कोरोनाचे ७४,३८३ रुग्ण आढळून आले होते. सोमवारी हा आकडा त्याहून कमी आहे.
जगामध्ये कोरोनाचे ३ कोटी ७७ लाखांहून अधिक रुग्ण आहेत. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या अमेरिकेमध्ये ७९ लाख ९२ हजार रुग्ण आहेत. या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतातील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा ८ लाखांनी कमी आहे.
दोन्ही देशांतील रुग्णसंख्येतील तफावत दिवसेंदिवस कमी होत असून, अमेरिकेवर काही दिवसांत मात करून भारत सर्वाधिक कोरोना रुग्णांचा देश होण्याची शक्यता आहे. तिसºया क्रमांकावर असलेल्या ब्राझिलमध्ये ५० लाख ९४ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत.
सलग १० दिवस ८० हजारांपेक्षा कमी रुग्ण
सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने उच्चांक गाठल्यानंतर आता आॅक्टोबर महिन्यात मात्र सलग दिलासा देणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोना संसर्ग झालेल्यांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. १ आॅक्टोबरनंतर देशातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या ८० हजारांच्या पुढे गेलेली नाही. येत्या काळातही हेच चित्र राहिल्यास लवकरच कोरोना रुग्णांची संख्या घटत जाईल.
कोरोना चाचण्यांची संख्या ८ कोटी ७८ लाखांवर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार ११ ऑक्टोबर रोजी
9,94,851 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशातील कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता 8,72,093 झाली आहे.