Coronavirus: अरे बापरे! आता ओमायक्रॉनचा भाऊही सापडला, डेल्मिक्रॉन असं झालं नामकरण, किती आहे धोकादायक, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 03:00 PM2021-12-22T15:00:00+5:302021-12-22T15:01:39+5:30
Coronavirus: Omicronने जगाला भीती दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी आता ओमायक्रॉन व्हेरिएंटचा एक भाऊही समोर आला आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये परिस्थिती बिघडत आहे. तसेच तिथे Delimcronची लाट सुरू झाल्याचे मानले जात आहे.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूने गेल्या दोन वर्षांपासून जगभरात धुमाकूळ घातले आहे. कोरोनाचा एक व्हेरिएंट गेला की काही काळातच नवा व्हेरिएंट समोर येत आहे. वुहानमधील कोरोनाच्या पहिल्या व्हेरिएंटमुळे पहिली लाट आली होती. तर डेल्टाने संपूर्ण जगात भयावह परिस्थिती निर्माण केली होती. दरम्यान, आता ओमायक्रॉनने जगाला भीती दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी आता ओमायक्रॉन व्हेरिएंटचा एक भाऊही समोर आला आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये परिस्थिती बिघडत आहे. तसेच तिथे डेल्मिक्रॉनची लाट सुरू झाल्याचे मानले जात आहे. तसेच भारतामध्येही आता कोरोनाचे रुग्ण पुन्हा हळुहळू वाढू लागले आहेत.
तज्ज्ञांना दिसत असलेला ओमायक्रॉनचा भाऊ अन्य कुणी नाही तर डेल्टा आणि ओमायक्रॉनचे मिळतेजुळते रूप आहे. त्याला डेल्मिक्रॉन असे नाव देण्यात आले आहे. यावेळी जगभरात दोन्हीही व्हेरिएंट मिळत आहेत. भारतामध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही २२० च्या पुढे गेली आहे. दरम्यान, या व्हेरिएंटचा वाढला फैलाव पाहता बुस्टर डोसची मागणी होत आहे. अनेक देशांमध्ये बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत डेल्टा आणि ओमायक्रॉन म्हणजेच डेल्मिक्रॉन किती भयानक रूप धारण करेल, याबाबत काही स्पष्ट सांगता येणार नाही.
काही तज्ज्ञांच्या मते देशातील सध्याच्या कोरोना रुग्णवाढ ही डेल्मिक्रॉनची लाट आहे. महाराष्ट्र सरकारच्या टास्क फोर्समधील सदस्य शशांक जोशी यांनी सांगितले की, अमेरिका आणि युरोपमध्ये डेल्मिक्रॉन (डेल्टा आणि ओमायक्रॉन स्पाईक) मुळे रुग्णांची छोटी लाट येत आहे. त्यांनी सांगितले की, भारतात ओमायक्रॉनचा किती आणि कसा प्रभाव पडेल हे पाहणे अद्याप बाकी आहे. भारतामध्ये डेल्टा व्हेरिएंटचा फैलाव हा खूप मोठ्या प्रमाणात झाला होता. सध्या देशामध्ये डेल्टाही उपस्थित आहे. जगातील इतर भागात डेल्टाची जागा आता ओमायक्रॉन घेत चालला आहे. मात्र डेल्टा डेरिवेटिव्स आणि ओमायक्रॉनचा काय परिणाम होईल, याचा अंदाज आतातरी व्यक्त करत येणार नाही.
भारतामध्ये सध्या हायब्रिड इम्युनिटी उपस्थित आहे. जोशी यांनी सांगितले की, मुंबई आणि दिल्लीमध्ये झालेल्या सीरो सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या ९० टक्के लोकसंख्येला कोरोना झाला होता. त्यांनी सांगितले की ८८ टक्के भारतीय नागरिकांनी कोरोनाविरोधातील लसीची किमान एक डोस घेतला आहे. अशा परिस्थितीत सरकार आणि तज्ज्ञांकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. तसेच लोकांना मास्क वापरण्याचे आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन केले जात आहे.