CoronaVirus News: कोरोना लस लवकरच बाजारात येणार; पण सर्वात आधी कोणाला मिळणार?; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 08:05 AM2020-08-21T08:05:26+5:302020-08-21T08:18:46+5:30
CoronaVirus News: सध्याच्या घडीला २०० पेक्षा जास्त लसींवर काम सुरू; लवकरच सकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यता
मुंबई: भारतासह जगातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्यातच ऑगस्टमध्ये कोरोनानं भारतात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. हर्ड इम्युनिटी आणि कोरोना लस हेच कोरोनाला रोखण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत. त्यातील कोरोना लसीच्या पर्यायाचा विचार करता सर्वात आधी कोणाला लस दिली जाणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक देशाचं याबद्दलचं धोरण वेगवेगळं असणार आहे.
भारतासारख्या खंडप्राय देशात नागरिकांना कोरोनावरील लस देणं अतिशय मोठं आव्हान असेल. त्यात बराच मोठा अवधी जाईल. त्यामुळे सर्वात आधी कोरोना लस कोणाला द्यायची हा प्रश्न आहे. त्यात कोरोना लढ्यात आघाडीवर काम करणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पालिकेतील कामगार आणि पोलिसांना प्राधान्य मिळण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाशी झुंज देणारी आघाडीची फळी सुरक्षित असणं गरजेचं असल्यानं त्यांना प्राधान्य देण्यात येऊ शकतं.
यासोबतच कोरोनाचा सर्वात धोका वृद्धांनादेखील प्राधान्य मिळू शकेल. मात्र त्यासाठी कोरोना लसीचे काही साईड इफेक्ट्स तर होत नाहीत ना, हे विचारात घेतलं जाईल. यानंतर कोरोनाचा सर्वाधिक फैलाव झालेल्या भागात लसीकरण करण्यात येईल. कोरोना संक्रमणाचा वेग सर्वाधिक असलेल्या भागांमधील नागरिकांना लस दिली जाईल. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखता येऊ शकेल.
१३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात कोरोनाच्या लसीची उपलब्धता आणि त्याची किंमत हा दोन महत्त्वाचा बाबी असतील. या गोष्टींचा विचार करून सरकारला योजना आखावी लागेल. उपलब्ध झालेल्या कोरोना लसींचा सर्वाधिक आवश्यकता असलेल्या भागांमध्ये, समूहांमध्ये वापर करून कोरोनाला रोखण्याचं आव्हान सरकारसमोर असेल.
जागतिक पातळीवर विचार केल्यास जगाची लोकसंख्या ८ बिलियनच्या घरात आहे. त्यामुळे सगळ्यांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी काही वर्षांचा कालावधी जाऊ शकतो. त्यातही कोरोनावरील लस पूर्णपणे उपयुक्त असेल असंही नाही. अमेरिकेतील प्रख्यात संसर्गतज्ज्ञ डॉ. अँथॉनी फॉसी यांनी तर ७० ते ७५ टक्के उपयुक्त असलेली लस मिळाली तरी आपण भाग्यवान असू असं म्हटलं आहे. त्यामुळे कोरोनावरील लस आली तरी लसीकरणदेखील आव्हानात्मक असणार हे स्पष्ट आहे.