CoronaVirus News: जगात भारी, भारतीयांची बातच न्यारी! 'ही' आकडेवारी देशाला सुखावणारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 08:53 IST2020-08-19T08:52:36+5:302020-08-19T08:53:07+5:30
CoronaVirus News: भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असल्याचं सीरो सर्वेक्षणांमधून समोर

CoronaVirus News: जगात भारी, भारतीयांची बातच न्यारी! 'ही' आकडेवारी देशाला सुखावणारी
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहे. कोरोना बाधितांचा आकडा २७ लाखांच्या पुढे गेला आहे. मात्र लवकरच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. देशाच्या शहरांमधील महापालिका आणि काही प्रमुख संशोधन संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून एक अतिशय दिलासादायक बाब समोर आली आहे. देशातील एक चतुर्थांश व्यक्तींच्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडी तयार झाल्याचं समोर आलं आहे.
पुण्यातील काही भागांमधील ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्याची आकडेवारी दोनच दिवसांपूर्वी समोर आली. याशिवाय मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ५७ टक्के व्यक्तींच्या शरीरातही सीरो-पॉझिटिव्हिटी दिसून आली. दिल्लीतही नुकतंच सीरो सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात २३ टक्के व्यक्ती सीरो-पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. दिल्लीतल्या दुसऱ्या टप्प्यातल्या सीरो सर्वेक्षणाचा अहवाल याच आठवड्यात येणार आहे.
शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडी कोरोनापासून बचाव करतात. रोगप्रतिकारशक्ती उत्तम असलेल्या व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडी आढळून येतात. मात्र या अँटीबॉडीमुळे किती काळ कोरोनापासून बचाव होतो, याबद्दल अद्याप तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. 'काही भागांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सीरो-पॉझिटिव्हिटी असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. त्यामुळे भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली असल्याचं दिसून येतं,' अशी माहिती राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या डॉ. शशांक जोशींनी दिली.
देशभरात थायरोकेअर लॅबोरेटरीकडून अँटीबॉडी टेस्ट केल्या जात आहेत. विविध भागांमध्ये चाचण्या घेऊन व्यक्तींच्या शरीरातील अँटीबॉडीज तपासल्या जात आहेत. 'देशात आतापर्यंत २ लाख लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातल्या जवळपास २४ टक्के लोकांमध्ये कोरोनाचा सामना करू शकणाऱ्या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. दिल्लीत २९ टक्के, तर महाराष्ट्रात २७ टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं. ठाण्यातील एक तृतीयांश, तर नवी मुंबईतील २१ टक्के नागरिक सीरो-पॉझिटिव्ह आहेत,' अशी आकडेवारी लॅबचे व्यवस्थापकीय संचालक अरोकियास्वामी वेलुमणी यांनी दिली.