CoronaVirus News: क्वारंटाईनमधून सूट मिळण्यासाठी हवाई प्रवासी करू शकतील ऑनलाईन अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 01:44 AM2020-08-12T01:44:46+5:302020-08-12T01:44:55+5:30
दिल्ली विमानतळावर सुविधा; राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग
नवी दिल्ली : दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. आणि जीएमआर समूहाच्या नेतृत्वाखालील कंसॉर्टियमने एक पोर्टल विकसित केले असून त्यावर अनिवार्य स्व-घोषित अर्ज भरून आंतरराष्ट्रीय प्रवासी अनिवार्य संस्थात्मक विलगीकरणातून (क्वारंटाईन) सूट मिळविण्याची विनंती करू शकतील.
आॅनलाईन अर्ज नागरी उड्डयन मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांच्या सहयोगाने विकसित करण्यात आला आहे. यात दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, हरियाणा, उत्तराखंड आणि मध्यप्रदेश यासारख्या राज्यांचा समावेश आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ही सुविधा ८ आॅगस्ट २०२० पासून भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना उपलब्ध असेल. आॅनलाईन स्व-घोषणेच्या आधारे अधिकारी विलगीकरणाचा निर्णय घेतील.
भारतात येणाºया आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरोग्य तपासणी बंधनकारक आहे. यात थर्मल टेम्परेचर स्क्रिनिंग आणि मास स्क्रिनिंग यांचा समावेश आहे. हे पोर्टल संपर्करहित असल्यामुळे प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित असेल, कारण आगमन पश्चात अर्ज भरण्याची गरज त्यांना राहणार नाही. भारताने अनेक देशांसोबत एअर बबल स्थापित केला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या वाढत आहे.
यात प्रवाशांना ७२ तास आधी दिल्ली विमानतळाच्या वेबसाईटवर अर्ज भरावा लागेल. पासपोर्टसह इतर सहायक दस्तावेजांच्या प्रती त्यासोबत जोडाव्या लागतील. त्यामुळे प्रत्येक वेळी हे दस्तावेज विभिन्न प्राधिकरणांकडे सादर करण्याची गरज राहणार नाही. हे दस्तावेज संबंधित राज्य सरकारांना आॅटो रूट केले जातील.
कोरोना टेस्ट करा, क्वारंटाईनमधून सूट मिळवा
जयपूर : विदेशातून येणाºया अनिवासी राजस्थानी व्यक्तींना सात दिवसांच्या सक्तीच्या क्वारंटाईनमधून वाचण्यासाठी एक योजना राजस्थान सरकारने आणली आहे. त्यासाठी प्रवाशांना स्वत:ची कोरोना टेस्ट करावी लागेल. टेस्ट निगेटिव्ह आल्यास प्रवाशांना थेट घरी जाता येईल. देशांतर्गत विमान प्रवाशांनाही राजस्थान सरकारने अशीच सवलत दिली आहे. आधी सर्वच प्रवाशांना क्वारंटाईन बंधनकारक होते.
देशांतर्गत प्रवाशांसाठी राजस्थानात १४ दिवस होम क्वारंटाईन करण्याचा नियम होता. यात आता बदल करण्यात आला आहे. क्वारंटाईन ऐच्छिक करण्यात आले आहे.