Coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या मृत्यूंतील ६० टक्के अति अँटिबायोटेक्सच्या वापराचे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 06:13 AM2021-05-29T06:13:10+5:302021-05-29T06:13:52+5:30
Coronavirus: कोरानाच्या मृत्यूमागचे प्रमुख कारण जर्नल इन्फेक्शन ॲण्ड ड्रग रेसिस्टंसमध्ये प्रकाशित झाले आहे.
नवी दिल्ली : कोरानाच्या मृत्यूमागचे प्रमुख कारण जर्नल इन्फेक्शन ॲण्ड ड्रग रेसिस्टंसमध्ये प्रकाशित झाले आहे. कोरोना काळात रुग्णांवर अँटिबायोटिक्सचा बेसुमार वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरात सुपरबग तयार होतो. परिणामी, बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन वेगाने वाढते, अशी माहिती संशोधन अहवालातून समोर आली आहे.
सूक्ष्मजीवांना (बॅक्टेरिया) निष्प्रभ करण्यासाठी अँटीबायोटिक्स वापरली जातात; मात्र अँटीबायोटिक्सचा अधिक वापर झाल्यास सूक्ष्मजीव त्यांच्याविरोधात प्रतिरोधक क्षमता विकसित करतात. त्यामुळे अँटीबायोटिक्स औषधांचा परिणाम होत नाही, अशी माहिती जर्नल इन्फेक्शन ॲण्ड ड्रग रेसिस्टंसने समोर आणली आहे. कोरोनावर परिणामकारक कॉकटेल ड्रगचा भारतात वापर; ७० टक्के प्रभावी असल्याचा दावा कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान रुग्णालयांत भरती झालेल्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात बॅक्टेरिया आणि फंगल इंफेक्शन आढळून आले होते. हे इंफेक्शन औषधांना निष्प्रभ करणारे सूक्ष्मजीव पसरवत होते.
मधुमेह, रक्तदाबाचा प्रश्न
संशोधन अहवालातील माहितीनुसार, कोरोना रुग्णांमध्ये अँटिबायोटिक्समुळे अतिरिक्त संक्रमण झाले. देशातील ६० टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू याच कारणामुळे झाला. त्यामुळे ६० टक्के मृत्यूंना केवळ बॅक्टेरिया आणि फंगसमुळे तयार झालेला सुपरबग कारणीभूत ठरला. या सुपरबगची शिकार न झालेल्यांपैकी केवळ ११ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. यातील बहुतांश जण मधुमेह आणि रक्तदाबाच्या आजाराला तोंड देत होते.