CoronaVirus: मोदी सरकारच्या ‘रणनीती’ने कोरोना हरेल?; 93 टक्के लोक म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 04:44 PM2020-04-23T16:44:30+5:302020-04-23T17:11:08+5:30
देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतातील कोरोना केसेसनी 21 हजाराचा आकडा ओलांडला आहे
कोरोना व्हायरस या अदृश्य शत्रूविरोधात अख्खं जग लढतंय. भारतही या संकटाचा जिद्दीनं मुकाबला करतोय. वेगवेगळी राज्य सरकारं कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पाठीशी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकारही भक्कम उभं आहे. सर्वच मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या पाठिंब्याबाबत अगदी जाहीरपणे समाधान व्यक्त केलं आहे. या पार्श्वभूमीवर, 93 टक्के लोकांना मोदी सरकारवर विश्वास असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी करत असलेल्या प्रयत्नांमुळे आपण कोरोना संकटावर मात करू शकू, अशी खात्री जनतेला वाटतेय.
आधी चीन, नंतर इटली, अमेरिकेसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूनं भारतावरही आक्रमण केलं असलं, तरी आपलं सरकार, प्रशासन आणि जनतेनं त्याला सर्व ताकदीनिशी रोखून धरल्याचं पाहायला मिळतंय. प्रचंड लोकसंख्या असूनही जगातील अनेक देशांच्या तुलनेत आपल्याकडील कोरोना संसर्गाचा वेग कमी आहे. कमी चाचण्या होणं, हेही त्यामागचं कारण असलं; तरी जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक राष्ट्रांनी, तज्ज्ञांनी भारताच्या प्रयत्नांना दाद दिली आहे. कालच, मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनीही भारताची पाठ थोपटलीय. केंद्र सरकारने अत्यंत योग्य वेळी लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याचं अनेकांनी आर्वजून नमूद केलंय.
बिल गेट्स यांनी थेट पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; म्हणाले...
संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारताची प्रशंसा; मदतीचे कौतुक
जगभरातून भारताचं कौतुक होत असताना, भारतातील जनतेला काय वाटतं, मोदी सरकार करत असलेल्या प्रयत्नांमुळे कोरोनाविरुद्धची लढाई जिंकता येईल का, याबद्दल IANS आणि सी-व्होटर यांनी एक सर्व्हे केला. त्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मोदी सरकारवरील जनतेचा विश्वास टप्प्याटप्प्याने वाढत गेला आहे. 25 मार्च रोजी नरेंद्र मोदींनी 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर तो 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात, 76.8 टक्के जनतेला मोदी सरकारच्या प्रयत्नांबद्दल खात्री वाटत होती. हाच आकडा 21 एप्रिल रोजी 93.5 टक्के इतका आहे.
31 मार्च रोजी 79.4 टक्के मतं मोदी सरकारच्या बाजूने पडली होती. त्यात 1 एप्रिलनंतर वेगानं वाढ झाली. जसजशी लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी होऊ लागल्याचं जाणवू लागलं, तसतसा जनतेचा सरकारवरचा विश्वास वाढत गेल्याचं या टक्केवारीतून स्पष्ट होतं.
Address to the nation. https://t.co/26sVP2br5n
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2020
अर्थात, देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतातील कोरोना केसेसनी 21 हजाराचा आकडा ओलांडला आहे आणि कोरोनाबळींची संख्या 681 झाली आहे. पुढे काय होऊ शकतं, याबद्दल मांडली जाणारी काही गणितं, अंदाज तर धडकी भरवणारे आहेत. अशा परिस्थितीत, जनतेला सरकारबद्दल वाटणारा विश्वास आशादायीच म्हणावा लागेल. कारण, नागरिकांच्या प्रतिसादाशिवाय, सहभागाशिवाय ही लढाई जिंकता येणारी नाही.