CoronaVirus : 'आम्हाला तुमचा अभिमान आहे', पाकच्या एटीसीकडून एअर इंडियाचे कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 08:52 AM2020-04-05T08:52:25+5:302020-04-05T08:53:35+5:30
CoronaVirus : एअर इंडियाच्या कामगिरीला पाकिस्तानने सुद्धा सलाम केला आहे.
नवी दिल्ली : सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात सुद्धा कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. तसेच, या संकटाच्या परिस्थितीत सुद्धा काही लोक आणि संस्था सुद्धा मोठी मदत करत आहे. यामध्ये एअर इंडियाचा सुद्धा समावेश आहे.
एअर इंडियाने कोरोनासारख्या संकटाच्या काळात लोकांना सुखरूप पोहोचविण्यासाठी सतत उड्डाणे केली आहेत. एअर इंडियाच्या या कामगिरीला पाकिस्तानने सुद्धा सलाम केला आहे. पाकिस्तानचे एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) यांनी संकटाच्या काळात लोकांची मदत केल्याप्रकरणी एअर इंडियाचे कौतुक केले आहे.
लॉकडाऊनमुळे भारतात अडकलेल्या युरोपीयन नागरिकांना एअर इंडियाच्या विमानाने फ्रँकफर्टला सुखरूप पोहोचविले. यासंबंधीची माहिती एअर इंडियाच्या एका वरिष्ठ कॅप्टनने दिली. यावेळी ते म्हणाले, "जसे की आम्ही पाकिस्तानच्या हवाई हद्दीत गेलो, त्यावेळी एअर ट्रॅफिफ कंट्रोलरने आमचे स्वागत केले. कंट्रोलरने म्हटले की, मदत पुरवठा करणार्या एअर इंडियाच्या विमानाचे स्वागत आहे."
या उड्डाणावेळी पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरने एअर इंडियाच्या पायलटला विचारले, 'कन्फर्म करा, आपण मदत सामग्रीसह फ्रँकफर्टला जात आहात?' त्यानंतर भारतीय पायलटकडून 'होय' असे उत्तर दिले. यानंतर पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरने भारतीय विमानांना पुढील आवश्यक सूचना दिल्या. याचबरोबर, अखेरीस पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरने एअर इंडियाचे कौतुक करत म्हटले आहे की, 'आम्हाला अभिमान आहे की अशा प्रकारची साथीची घटना घडली तरी तुमचे विमान उड्डाण करत आहे. शुभेच्छा! त्यानंतर भारतीय पायलटने कौतुक केल्याबद्दल पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरचे आभार मानले.
दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत ११ लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ६३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही ३ हजारहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.