Coronavirus Pandemic: कोविडमुळे आई गमावली अन् बाबाही; 'त्या' ५७७ मुला-मुलींना देणार मायेचं छत्र; केंद्राची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 01:22 PM2021-05-26T13:22:32+5:302021-05-26T13:24:38+5:30
केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी दिली माहिती. प्रत्येक बालकाच्या संरक्षणासाठी आणि सहकार्यासाठी कटिबद्ध असल्याची इराणी यांनी माहिती.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अनेक जणांना कोरोनाची बाधा झाली. तर तुलनेनं अधिक लोकांचा मृत्यूही झाला. दरम्यान, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यांकडून मिळालेल्या अहवालाचा हवाला देत ५७७ बालकांच्या डोक्यावरून या महासाथीमुळे आई-वडिलांचं छत्र हरपल्याची माहिती दिली. तसंच कोरोनामुळे आपल्या आई-वडिलांना गमावणाऱ्या बालकांच्या संरक्षणासाठी आणि सहकार्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचंही त्या म्हणाल्या.
"कोरोनाच्या महासाथीत आपल्या पालकांना गमावलेल्या त्या प्रत्येक बालकाचं संरक्षण करण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडून माहिती देण्यात आली आहे. १ एप्रिलपासून ५७७ बालकांच्या आई-वडिलांचं करोनामुळे निधन झालं," अशी माहिती स्मृती इराणी यांनी दिली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली.
GOI is committed to support and protect every vulnerable child due to loss of both parents to Covid-19. From 1st April 2021 till 2:00 PM today, the State Governments & UTs across the country have reported 577 children whose parents succumbed to Covid-19.
— Smriti Z Irani (@smritiirani) May 25, 2021
सूत्रांच्या म्हणण्यानुसार ही मुलं एकटी नाहीत, तसंच ते जिल्हा प्रशासनाच्या संरक्षण आणि देखरेखीखाली आहेत. अशा मुलांना काऊंसिलिंगची गरज पडली तर राष्ट्रीय मानसिक तपास आणि तांत्रिक विज्ञान संस्थानामध्ये (निमहंस) टीम तयार आहे. तसंच मुलांच्या कल्याणासाठी निधीची कोणतीही कमरता भासू दिली जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच महिला आणि बालकल्याण मंत्रालयाचे सचिव राम मोहन मिश्रा यांनी भारत लवकरच नऊ देशांमधील आपल्या उच्चायोगांमध्ये आणि दूतावासांमध्ये वन स्टॉप सेंटर सुरू करणार असल्याचं सांगितलं.