'फेस मास्क'चा कचरा वाढवतोय भारत अन् चीनचं टेन्शन; तज्ज्ञांनी दिला मोठा इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 06:43 PM2022-05-27T18:43:17+5:302022-05-27T18:43:47+5:30
कोविड-19 महामारी दरम्यान संसर्गाचं प्रमाण कमी करण्यासाठी प्लास्टिक उत्पादनांच्या प्रचंड वापरामुळे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि विल्हेवाट प्रणालीवर खूप दबाव आला.
नवी दिल्ली-
कोविड-19 महामारी दरम्यान संसर्गाचं प्रमाण कमी करण्यासाठी प्लास्टिक उत्पादनांच्या प्रचंड वापरामुळे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि विल्हेवाट प्रणालीवर खूप दबाव आला. संसर्ग टाळण्यासाठी आणि विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी फेस मास्कचा वापर अनिवार्य आहे. मात्र त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याने फेस मास्कचा कचरा वाढत आहे. या कारणामुळे दरवर्षी १५.४ लाख टन मायक्रोप्लास्टिक तयार होत आहे, जे आरोग्यासाठी तसेच पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. श्री रामस्वरूप मेमोरियल युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ डॉ. सौरभ शुक्ला, रमशा खान आणि डॉ. अभिषेक सक्सेना यांच्या अभ्यासातून ही महत्वाची बाब समोर आली आहे.
रामस्वरूप मेमोरियल युनिव्हर्सिटी (सिव्हिल इंजिनिअरिंग फॅकल्टी) आणि संशोधक डॉ. सौरभ शुक्ला यांच्या टीमनं दिलेल्या माहितीनुसार ३६ देशांमधून कोट्यवधी टनांहून अधिक फेस मास्क कचऱ्यात जमा झाले आहेत. ज्यातून सुमारे १७ लाख टन मायक्रोप्लास्टिक तयार झालं आहे. "भारतात दरवर्षी सुमारे २३,८८८.१ कोटी मास्क वापरले जातात. त्यांचे एकूण वजन सुमारे २४.४ लाख टन आहे. त्याच वेळी, यामुळे सुमारे १५.४ लाख टन मायक्रोप्लास्टिक आणि पॉलीप्रॉपिलीन (पीपी) तयार होत आहे", असं डॉ. शुक्ला म्हणाले.
जगातील सर्वात जास्त लोकसंख्या चीनची आहे. यामुळे चीनमध्ये सर्वाधिक फेस मास्कचं उत्पादन केलं जातं. चीनची एकूण लोकसंख्या १,४३,९३,२३,७७६ इतकी आहे. ही लोकसंख्या दरवर्षी सुमारे ४०.८ लाख टन फेस मास्क वापरत आहे. सुमारे २५.८ लाख टन मायक्रोप्लास्टिक यातून तयार होत आहे. भारताची लोकसंख्या दरवर्षी २४.३७ लाख टन फेस मास्क वापरत आहे, जे सुमारे १५.४१ लाख टन मायक्रोप्लास्टिक्स तयार करत आहे.
"कोविड-19 महामारीच्या काळात फेस मास्कच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सागरी पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यांचं योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. शहरांमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडलेले फेस मास्क विषाणूच्या प्रसाराचे माध्यम असू शकतात, विशेषत: विकसनशील देशांमध्ये याचं प्रमाण अधिक असू शकतं. मायक्रोप्लास्टिक्समुळे माती दूषीत होत असल्याचं काही अभ्यासांतून समोर आलं आहे. त्याचबरोबर त्याचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम सागरी जीवांना निर्माण होत असल्याचंही समोर आलं आहे. मायक्रो प्लास्टिक गिळंकृत केल्यानं समुद्री जीवांना धोका निर्माण होत आहे. सागरी जीवनावर मायक्रोप्लास्टिक्सचा संभाव्य प्रभाव सागरी जीवांना (समुद्री कासव, मासे, व्हेल इ.) धोक्यात आणतो. हे सागरी प्राणी अनेकदा चुकून मायक्रोप्लास्टिक्सचे सेवन करतात आणि काहीवेळा अडकतात. ज्यामुळे इजा आणि मृत्यू संभवतो", असं डॉ. शुक्ला म्हणाले.
मायक्रोप्लास्टिक अतिशय धोकादायक
- मायक्रोप्लास्टिक्स निसर्गातील भौतिक, एन्झाइमॅटिक आणि सूक्ष्मजीव ऱ्हासाच्या विविध प्रक्रियेतून जातात, परंतु त्याचं पूर्णपणे विघटन होत नाही.
- दरवर्षी सुमारे ५ ते १४ दशलक्ष टन प्लास्टिक कचरा समुद्रात जातो. महासागरातील प्राथमिक मायक्रोप्लास्टिक्सचे सरासरी वार्षिक जागतिक आकडा अंदाजे १.५ दशलक्ष टन आहे.
- मायक्रोप्लास्टिक्स अत्यंत हानिकारक हायड्रोफोबिक सेंद्रिय प्रदूषक शोषून घेऊ शकतात.
- जल प्रवाहातून मायक्रोप्लास्टिक काढून टाकणे अत्यंत कठीण आहे. प्लॅस्टिक टेक्सटाईल तंतूपासून तयार होणारे मायक्रोप्लास्टिक कण हवेतही असतात.