Coronavirus गायिका कनिका कपूरसोबत पार्टी केली; वसुंधरा राजे, योगींच्या मंत्र्याचे रिपोर्ट आले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 04:36 PM2020-03-21T16:36:56+5:302020-03-21T16:37:25+5:30
लंडनहून परतल्यानंतर काही दिवसांपूर्वीच तिने पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. याठिकाणी मोठमोठ्या हस्ती हजर होत्या.
नवी दिल्ली : गायिका कनिका कपूरमुळे दिल्लीच्या कॅबिनेट मंत्र्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांचेच ढाबे दणाणले आहेत. कारण कनिका कपूर कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून तीने दोन पार्ट्यांमध्ये सहभाग घेतला होता.
लंडनहून परतल्यानंतर काही दिवसांपूर्वीच तिने पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. याठिकाणी मोठमोठ्या हस्ती हजर होत्या. वेटर, हॉटेलचे कर्मचारी असा जवळपास ७०० जणांचा आकडा आहे. यातील काहींनी तिच्यासोबत सेल्फीही काढला आहे. यामुळे कोरोनाचा व्हायरस पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
कनिका कपूरने रविवारी लखनऊमध्ये एक पार्टी आयोजित केली होती. त्यात अनेक अधिकारी आणि काही नेतेमंडळीही उपस्थित होती. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे चिरंजीव भाजपा खासदार दुष्यंत सिंह हे देखील या पार्टीला गेले होते. त्यानंतर ते संसदेतही हजर राहिले होते. तिथे अनेकांना भेटले. अगदी, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्येही ते गेले होते. त्यामुळे कनिकाला कोरोनाची लागण झाल्याचं उघड होताच, संसदेत धाकधूक वाढली आहे. दुष्यंत सिंह क्वारंटाईनमध्ये असून आपण सर्वतोपरी खबरदारी घेत असल्याचं ट्विट वसुंधरा राजे यांनी केलंय.
तर दुसऱ्या पार्टीमध्ये योगी आदित्यनाथांचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह हे देखील गेले होते. यामुळे त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर वसुंधरा राजेंचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यांच्यासह ४५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना घरातच राहण्याचे सांगण्यात आले आहे.
धास्ती कोणी कोणी घेतली?
दुष्यंतसिंह यांनी मार्च १८ संसदीय कमिटीची बैठकही घेतली होती. यात रेल्वे बोर्डाचे चेअरमन, नागरी उड्डाण खात्याचे आणि पर्यटन विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. तसेच दुष्यंतसिंह संसदेत ज्या जागेवर बसतात त्याच्या पुढच्या सीटवर टीएमसीचे खासदार डेरेक ब्रिएन, वरुन गांधी, देवेंदर हुंडा यांच्यासह ६ खासदारांनीही स्वत: विलग करुन घेतलं आहे. कनिकाच्या लखनौ येथील पार्टीत युपीचे भाजपा नेते आणि आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह देखील उपस्थित होते. त्यांनी १७ मार्च रोजी कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली होती. याबैठकीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव मौर्य, दिनेश शर्मा यांचीही उपस्थिती होती. त्यामुळे या सर्व नेत्यांनाही कोरोनाचा धोका असण्याची शक्यता बळावली आहे.