CoronaVirus News : रुग्णालयात बेड मिळाला नाही, म्हणून रुग्णानं उभारलं रुग्णालय अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 04:55 PM2020-07-29T16:55:49+5:302020-07-29T16:56:58+5:30
उपचारातून बरे झाल्यानतंर बेड नसल्यामुळे त्रास सहन केलेल्या या रुग्णाने मोठे काम हाती घेतले.
बंगळुरू : कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, एक रुग्ण रुग्णालयात दाखल होण्यासाठी फिरत होता. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला पाच रुग्णालयांमध्ये नेले, पण कोणत्याही रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यामुळे त्याला दाखल करून घेतले नाही. त्यानंतर मित्राच्या शिफारशीनंतर त्याला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारातून बरे झाल्यानतंर बेड नसल्यामुळे त्रास सहन केलेल्या या रुग्णाने मोठे काम हाती घेतले. आपल्या सारखा त्रास इतर रुग्णांना होऊ नये म्हणून त्याने सर्वात आधी स्वत:चे रुग्णालय उभारले.
कर्नाटकातील बंगळुरू येथे राहणारे संजय गर्ग (49) यांची प्रकृती चिंताजनक होती. तपासणीत, 28 जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले. याबाबत संजय यांनी सांगितले की, कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होताना खूप त्रास सहन करावा लागला. घरातील लोक एका रुग्णालयातून दुसर्या रुग्णालयात जात राहिले. मात्र, कोणत्याही रुग्णालयाने दाखल करून घेतले नाही.
संजय यांनी सांगितले की, ते अग्रवाल समाजाचे आहेत. कोरोनापासून बरे झाल्यानंतर संजय यांनी आपल्या समाजातील लोकांशी संपर्क साधला. त्यांनी कोविड केअर सेंटर बनविण्याचे काम क्वारंटाईन असताना सुरू केले. त्यांनी जिगणी होबलीच्या मीनाक्षी मेडॉसला ४२ बेड्सच्या अग्र सेवा कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतर केले.
आरोग्य विभाग आणि खासगी रुग्णालयाशी संजय यांनी संपर्क साधला. त्यानंतर आरोग्य विभागाकडून या कोविड केअर सेंटरला दोन डॉक्टर व चार परिचारिका सेवेसाठी पाठविण्याचा निर्णय झाला. इथल्या खोल्या रुग्णालयाप्रमाणे तयार झाल्या. बेड्स लावण्यात आले आणि डॉक्टर, परिचारिका रूग्णांवर उपचार करण्यास तयार झाले. या कोविड केअर सेंटरमध्ये एक वायफाय सुविधा आणि इनडोर गेम्स देखील आहेत.
ज्यावेळी रुग्णालयात दाखल करून घेतले नाही, त्यावेळी ही समस्या समजली, असे संजय म्हणाले. सुरुवातीला मोफत उपचारांसाठी रुग्णालय तयार केले. मात्र, अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार फारच कमी शुल्क आकारले जात आहे. रूग्णालयाच्या चांगल्या कामकाजासाठी थोडे शुल्क आकारण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिल्याचे संजय यांनी सांगितले.