coronavirus: लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी रुग्ण लाखावर? जागतिक यादीत भारत चीनला मागे टाकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 06:12 AM2020-05-15T06:12:20+5:302020-05-15T06:12:24+5:30
भारत ७० हजारांपेक्षा जास्त रुग्णसंख्येसह जागतिक यादीत बाराव्या क्रमांकावर आहे. मात्र, ८ मे रोजी ६० हजार रुग्णसंख्या गाठणाऱ्या भारतात ७० हजारांच्या आकड्यासाठी केवळ ३ दिवस लागले.
नवी दिल्ली : कोरोना रुग्णांच्या जागतिक यादीत लवकरच भारत चीनला मागे टाकण्याची भीती आहे. मे महिन्यात कोरोनाची संख्या सातत्याने वाढते आहे. देशव्यापी लॉकडाऊन असले तरी देशात दहा हजार रुग्ण समोर येण्यासाठी सरासरी ३ ते ४ दिवसांचा कालावधी १० मेनंतर लागतो आहे. जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत असून, चीन ११ व्या क्रमांकावर
आहे.
भारत ७० हजारांपेक्षा जास्त रुग्णसंख्येसह जागतिक यादीत बाराव्या क्रमांकावर आहे. मात्र, ८ मे रोजी ६० हजार रुग्णसंख्या गाठणाऱ्या भारतात ७० हजारांच्या आकड्यासाठी केवळ ३ दिवस लागले. भारतच नव्हे, तर जागतिक आरोग्य संघटनेची चिंता त्यामुळे वाढली आहे. एकीकडे अर्थव्यवस्था हादरली असताना कोरोनाचा प्रसार थांबण्याची चिन्हे नाहीत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला तर कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपताना भारतात १ लाखापेक्षा जास्त रुग्ण असतील, असा अंदाज दररोजच्या आकडेवारीवरून काढण्यात आलाय. अर्थात, एकूण रुग्ण १ लाखांवर गेले तरी त्यातील बरे झालेल्या २६ हजार ५६४ जणांना वगळण्यात येईल. मृत्यू झालेल्यांची संख्या २,५६४ इतकी आहे. त्यामुळे सध्या भारतात ७२ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य मंत्रालयाची चिंता वाढली
मे महिन्यात दररोज बरे होणाऱ्यांपेक्षा दुप्पट नवे रुग्ण समोर येत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी नव्या रुग्णांची दररोज भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाची चिंता वाढली आहे.
10 देशांमध्ये रुग्णसंख्या एक लाखापेक्षा जास्त आहे. चीन ८२ हजार ९२९ रुग्णांसह अकराव्या, तर भारत ७८ हजार ८१० रुग्णांसह बाराव्या क्रमांकावर आहे. पुढच्या दोन दिवसांत भारत चीनला मागे सारून टॉप टेनमध्ये जाईल, अशी भीती वर्तवली जात आहे.
बरे होणाºयांचा आलेख वाढवून नव्या रुग्णांचा आलेख आधी समांतर व नंतर कमी करण्यासाठी आता आरोग्य मंत्रालयात युद्धपातळीवर बैठका होत आहेत.
1411 लोकांची दर दहा लाखांमागे भारतात होत आहे चाचणी. अमेरिकेत हे प्रमाण ३१ हजार २७ आहे. इराणदेखील चाचण्यांमध्ये भारतापेक्षा पुढे आहे. तेथे दहा लाख लोकांसाठी ७ हजार ६६५ जणांची चाचणी करण्यात येते.