coronavirus : कोरोना संशयित महिलेच्या अंत्यसंस्कारांवरून लोक भडकले, पोलिसांवर दगड फेकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 13:07 IST2020-04-28T12:57:30+5:302020-04-28T13:07:49+5:30
कोरोनाच्या फैलावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोबतच लोकांमध्ये अनेक समज गैरसमज पसरत आहेत. त्यातून काही गंभीर प्रश्न उदभवत आहेत.

coronavirus : कोरोना संशयित महिलेच्या अंत्यसंस्कारांवरून लोक भडकले, पोलिसांवर दगड फेकले
अंबाला (हरियाणा) - देशात वेगाने होत असलेल्या कोरोनाच्या फैलावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोबतच लोकांमध्ये अनेक समज गैरसमज पसरत आहेत. त्यातून काही गंभीर प्रश्न उदभवत आहेत. दरम्यान, हरियाणामधील अंबाला येथील चांदपुरा गावात एका कोरोना संशयित महिलेच्या अंत्यसंस्कारावरून मोठा गोंधळ झाला. लॉकडाऊनचे उल्लंघन करत लोकांनी संबंधित महिलेचे अंत्यसंस्कार सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेत अंत्यसंस्कारास विरोध केला. अखेरीस पोलिसांनी हवेत गोळीबार करून जमावाला पांगवले. त्यानंतर या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल अद्याप आला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 'या महिलेला दम्याचा त्रास होता. सोमवारी दुपारपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिची कोरोना चाचणी करण्यासाठी निर्धारित प्रक्रियेचे पालन करून नमुने घेण्यात आले असून, त्यानंतर तिचा मृतदेह जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला,' असे सिव्हिल सर्जन कुलदीप सिंह यांनी सांगितले. मात्र गावकऱ्यांनी विनाकारण अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला, असेही सिंह यांनी सांगितले.
याबाबत अंबाला कॉन्टोनमेंटचे डीएसपी राम कुमार यांनी सांगितले की, सर्व खबरदारी घेऊन अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याचे आम्ही गावकऱ्यांना सांगितले. मात्र ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी डॉक्टर आणि पोलिसांवर दगडफेक सुरू केली. तसेच अँब्युलन्सचेही नुकसान केले. अखेरीस जमावाला पांगवण्यासाठी आम्हाला बळाचा वापर करावा लागला. आता डॉक्टर आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे राम कुमार यांनी सांगितले.