coronavirus : लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाही आहेत! मोदी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 10:39 AM2020-03-23T10:39:46+5:302020-03-23T11:01:38+5:30
जनता कर्फ्यूला एक दिवस उलटतो न उलटतो तोच कोरोनाबाबतचे लोकांमधील गांभीर्य हरवले असून, लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत.
नवी दिल्ली - रविवारीजनता कर्फ्यूनिमित्त कडकडीत बंद पाळून देशातील जनतेने कोरोधाविरोधात लढण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले होते. मात्र जनता कर्फ्यूला एक दिवस उलटतो न उलटतो तोच कोरोनाबाबतचे लोकांमधील गांभीर्य हरवले असून, लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. मुंबईतील काही ठिकाणी वाहतूक कोंडीसारखी परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, या प्रकारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी संतप्त झाले असून, लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
"लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाही आहेत. कृपा करून स्वतःला वाचवा, स्वतःच्या कुटुंबाला वाचवा, दिलेल्या आदेशांचे पालन करा. तसेच राज्य सरकारांनीही जनतेकडून नियमांचे पालन करवून घेतले पाहिजे, असे आवाहन मोदींनी केले आहे.
लॉकडाउन को अभी भी कई लोग गंभीरता से नहीं ले रहे हैं। कृपया करके अपने आप को बचाएं, अपने परिवार को बचाएं, निर्देशों का गंभीरता से पालन करें। राज्य सरकारों से मेरा अनुरोध है कि वो नियमों और कानूनों का पालन करवाएं।
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2020
देशात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्यांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देशातील विविध राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. एकीकडे संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक थांबवलेली आहे, तर अनेक भागात दैनंदिन व्यवहारांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र असे असूनही लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत.