Coronavirus:...म्हणून इटलीहून परतलेला ‘तो’ भारतीय तरुण ५ दिवसांत विलगीकरण कक्षातून बाहेर आला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 08:10 AM2020-03-23T08:10:32+5:302020-03-23T08:12:07+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी संध्याकाळी ५ वाजता लोकांनी थाळीनाद, टाळ्या वाजवून आभार मानले.
नवी दिल्ली – चीनसह संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतातही अनेक राज्यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू पाळण्यात आला. सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत देशातील बहुतांश शहरात लोकांनी घरातच राहणं पसंत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी संध्याकाळी ५ वाजता लोकांनी थाळीनाद, टाळ्या वाजवून आभार मानले. सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या ३९६ वर पोहचली आहे तर आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगात ३ लाख ३० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १४ हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात इटलीहून भारतात परतलेल्या लोकांना भारत-तिबेट सीमेवर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. त्यातील एका विद्यार्थ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विलगीकरण कक्षात असताना विद्यार्थ्याने आपल्या पित्याचं छत्र गमावलं. त्या विद्यार्थ्यामध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षण अद्याप आढळून आले नाही. मात्र केंद्र सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्या विद्यार्थ्याला वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी दिली.
याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाच दिवसांच्या काळात या विद्यार्थ्याची दोनदा तपासणी करण्यात आली. राज्यातील अधिकारी त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. या विद्यार्थ्याची ओळख सांगू शकत नाही. आयटीबीपी विलगीकरण कक्षातून त्याला २० मार्च रोजी बाहेर जाण्याची परवानगी दिली.
कोरोना प्रभावित इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी २३४ भारतीय नागरिकांना रविवारी एअर इंडियाच्या दोन विमानांनी भारतात आणण्यात आले. या प्रवाशांना जैसलमेरच्या भारतीय सैन्याच्या आरोग्य केंद्रात वेगळे ठेवण्यात आले आहे. संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल संबित घोष यांनी सांगितले की, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणहून एकूण २३४ भारतीयांना परत आणण्यात आलं होतं. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ भाविक आहेत. यातील हा एक विद्यार्थी आहे. मात्र त्याला केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आरोग्य सेवा महासंचालनालयाने विशेष सहानुभूतीच्या परिस्थितीत स्वतंत्र केंद्राबाहेर जाण्यास परवानगी दिली आहे असं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.