Coronavirus: ‘हा’ तर मला वादात टाकण्याचा डाव; खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला ‘त्या’ मॅसेजचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 05:53 PM2020-04-08T17:53:23+5:302020-04-08T17:58:40+5:30
लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियात अनेक अफवांना उधाण आलं आहे.
नवी दिल्ली – देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना केंद्र सरकारसमोर कोरोना रोखण्याचं आव्हान निर्माण झालं आहे. देशात ५ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १४० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशातच सोशल मीडियात अफवांचे पेव फुटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांना फटकारलं आहे. पंतप्रधानांनी ट्विट करुन म्हटलंय की, माझ्या सन्मानासाठी ५ मिनिटे उभं राहून गौरव करावा अशाप्रकारे काही लोक मोहीम सुरु करत आहेत हे माझ्या कानावर आलं आहे. प्रथमदर्शनी मोदींना वादात टाकण्याचा हा डाव वाटतो अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
जर माझा गौरव करण्याची कोणाची सदिच्छा असेल माझ्याप्रती प्रेमभावना असेल तर एका गरीब कुटुंबाची जबाबदारी तोपर्यंत घ्या जोवर देशातून कोरोना व्हायरसचं संकट संपत नाही. यापेक्षा माझा गौरव काही असू शकत नाही असं आवाहन नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन केलं आहे.
हो सकता है कि यह किसी की सदिच्छा हो, तो भी मेरा आग्रह है कि यदि सचमुच में आपके मन में इतना प्यार है और मोदी को सम्मानित ही करना है तो एक गरीब परिवार की जिम्मेदारी कम से कम तब तक उठाइए, जब तक कोरोना वायरस का संकट है। मेरे लिए इससे बड़ा सम्मान कोई हो ही नहीं सकता।
— Narendra Modi (@narendramodi) April 8, 2020
लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियात अनेक अफवांना उधाण आलं आहे. यातच एक अफवा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानासाठी ५ मिनिटं उभं राहून त्यांचा गौरव करावा असं आहे. मात्र या अफवेबद्दल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलं आहे.
काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनी देशातील लोकांना टाळी-थाळीनाद करुन कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्सबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगितले होते. त्यानंतर कोरोनाच्या लढाईत देशाची सामूहिक शक्ती दाखवण्यासाठी घरात दिवे, मोबाईल टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दोन्ही आवाहनांना देशातील लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. तर दिवे लावण्यावरुन विरोधकांनी मोदींवर टीकास्त्रही सोडलं होतं.
दिवे लावण्यापेक्षा कोरोनाविरुद्ध पंतप्रधान म्हणून काय उपाययोजना केल्या, स्थलांतरित गरिबांना होणाऱ्या त्रासाबद्दल काय नियोजन केले यासारखे अनेक प्रश्न विरोधकांनी उभे केले होते. त्यानंतर सोशल मीडियात नरेंद्र मोदींच्या गौरवासाठी ५ मिनिटे उभं राहून सन्मान करावा असा मॅसेज व्हायरल होऊ लागला. त्यामुळे खुद्द पंतप्रधानांनी याचं स्पष्टीकरण देऊन लोकांना आवाहन केले आहे.