Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली लोकांना ताकीद; ‘ती’ चूक पुन्हा करु नका, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 12:00 PM2020-04-03T12:00:40+5:302020-04-03T12:02:39+5:30
शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील लाईट्स बंद करण्यास सांगितले.
नवी दिल्ली – कोरोनाविरुद्ध लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात सामूहिक शक्तीचं दर्शन दाखवण्याचं आवाहन केले आहे. देशात कोरोनाच्या संकटात लढताना कोणालाही आपण एकटे आहोत असं वाटू नये यासाठी मोदींनी लोकांना व्हिडीओच्या माध्यमातून संदेश दिला आहे. ५ एप्रिल रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी देशात प्रकाशाचा तेज निर्माण करा यामुळे १३० कोटी जनतेची महाशक्ती या संकटाविरोधात एकवटली आहे हे दिसून येईल असं सांगितले.
शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील लाईट्स बंद करण्यास सांगितले. त्याचसोबत घराच्या दरवाजात, बालकनीत उभं राहून ९ मिनिटे मेणबत्ती, दिवा, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅशलाईट लावण्याचं आवाहन केले. त्यामुळे चारही दिशांना प्रत्येक व्यक्ती दिवा लावेल त्या प्रकाशातून महाशक्तीचं रुप दिसेल. याचा अर्थ असा की, कोरोना संकटाचा मुकाबला कोणी एकटा करत नाही तर सामूहिकपणे आपण या लढाईत उतरलो आहे असं मोदी म्हणाले.
मात्र हे आवाहन करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सांगायलाही विसरले नाहीत की, याचं कोणतंही आयोजन करु नका, कोणत्याही रस्त्यावर, गल्लीबोळात एकत्र जमू नका, फक्त घरातील दरवाजा, बालकनी याचठिकाणी हे करायचं आहे. सोशल डिस्टेंसिगची लक्ष्मण रेषा पार करु नका, कोणत्याही स्थितीत सोशल डिस्टेंसिंगचा नियम तोडू नये हाच रामबाण उपाय आहे असं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली त्यावेळी त्यांनी २९ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता लोकांना थाळी, टाळी आणि घंटानाद करुन आरोग्य कर्मचारी जे कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असं आवाहन केलं होतं तेव्हा मोदींच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. परंतु त्यावेळी काही लोकांनी घराबाहेर पडून, रस्त्यावर एकत्र जमून थाळीनाद, रॅली काढून सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांना हरताळ फासला. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे लॉकडाऊन उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता याबाबत खबरदारी घेतल्याचं दिसून आलं.
महत्त्वाच्या बातम्या
तिमिरातुनी तेजाकडे... ५ एप्रिलला रात्री ९ वाजता घरोघरी दिवा लावू या: पंतप्रधान
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी चीनची अनोखी शक्कल; पटकन् बरे झाले हजारो रुग्ण!
Coronavirus: देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वेगाने वाढ; फक्त ४ दिवसात आढळले ‘एवढे’ रुग्ण
Coronavirus: 'तबलिगी जमातचे 'ते' लोक नर्सेस समोरच बदलतात कपडे, करतात अश्लील कृत्ये'