Coronavirus :'कोरोनावाला बाबा'ला पोलिसांकडून अटक; 11 रुपयांत देत होता कोरोना ठीक करण्याचं तावीज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 09:07 AM2020-03-16T09:07:01+5:302020-03-16T10:31:33+5:30
Coronavirus : जे लोक मास्क घालू शकत नाहीत, ते तावीज बांधून कोरोनाला दूर पळवू शकतात. या बोगस बाबाचं नाव बाबा अहमद सिद्दिकी असं आहे.
लखनऊः उत्तर प्रदेश पोलिसांनी लखनऊमध्ये एका भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत. हा भोंदूबाबा कोरोना व्हायरस ठीक करण्याचा दावा करत होता. तसेच तो 11 रुपयांमध्ये तावीजही देत होता. या बोगस बाबानं डालिगंजस्थित आपल्या दुकानाबाहेर एक बोर्ड लावला होता. ज्यात या जीवघेण्या रोगाला बरा करण्याचा दावा केला जात होता. या बोर्डवर लिहिलं होतं की, जे लोक मास्क घालू शकत नाहीत, ते तावीज बांधून कोरोनाला दूर पळवू शकतात. या बोगस बाबाचं नाव बाबा अहमद सिद्दिकी असं आहे.
मुख्य चिकित्सा अधिकारी यांनी सांगितलं की, पोलिसांना याची माहिती दिली आहे. पोलिसांनी आरोपी बाबाला फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास चंद्र त्रिपाठी म्हणाले, आरोपी स्वतःला कोरोनावाला बाबा म्हणत होता आणि साध्याभोळ्या माणसांना कोरोनावर उपचार करत असल्याचं सांगून ठगत होता. लखनऊमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच 11 रुग्णांना निगराणीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या तपासणी अहवालाची वाट पाहिली जात आहे.
भारतात कोरोना व्हायरच्या रुग्णांची संख्या 108 वर पोहोचली आहे. त्यामुळे याचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहेत. तर, यासंदर्भात नागरिकांनी काळजी घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून जनजागृती करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत.