CoronaVirus: तब्बल २५ दिवस गुहेत लपलेले 'ते' पर्यटक बाहेर आले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 01:07 AM2020-04-21T01:07:08+5:302020-04-21T06:52:20+5:30
गेले २५ दिवस उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यात गंगा नदीच्या काठी गुहांमध्ये मुक्काम
डेहराडून: ‘लॉकडाऊन’ लागू झाल्यापासून गेले २५ दिवस उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यात गंगा नदीच्या काठी गुहांमध्ये राहणाऱ्या सहा परदेशी नागरिकांना पोलिसांनी तेथून बाहेर काढून तपासणीनंतर सरकारी इस्पितळात क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. लक्ष्मणझुला पोलीस ठाण्याचे प्रमुख राखेंद्र सिग थकैत यांनी सांगितले की, पर्यटक म्हणून आलेले हे विदेशी नागरिक आधी हरिद्वारच्या मुनी की रेती भागातील हॉटेलांमध्ये राहात होते. परंतु पैसे संपल्याने त्यांना हॉटेले सोडावी लागली.
नंतर ‘लॉकडाऊन’ लागू झाल्यावर बाहेर राहणे शक्य नसल्याने त्यांनी गारु छत्ती भागात गंगेजवळच्या विविध गुहांमध्ये राहणे सुरु केले. बाजारात जाऊन थोडे फार सामान आणायचे व गुहेतच चूल पेटवून शिजवून खायचे, असा त्यांचा दिनक्रम सुरु होता. या सहाजणांमध्ये चार पुरुष व दोन महिला आहेत. त्यापैकी दोघे युक्रेनचे तर इतर तुर्कस्तान, अमेरिका, फ्रान्स आणि नेपाळचे नागरिक आहेत.