Coronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 07:07 AM2021-05-18T07:07:24+5:302021-05-18T07:07:44+5:30
ॲस्ट्राझेनेकाचे दुष्परिणाम नगण्य; रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण अत्यल्प, १५ राज्यांची मात्र सरकारला काळजी
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी २४४ जिल्ह्यांत रुग्ण सकारात्मक (पॉझिटिव्हिटी रेट) निघण्याचे प्रमाण २० टक्क्यांच्या वर असल्यामुळे केंद्र सरकारला काळजी वाटत आहे. काही जिल्ह्यांत हीच टक्केवारी ३० टक्के आहे. देशातील ७१९ जिल्ह्यांपैकी ४७९ जिल्ह्यांत १० टक्क्यांपेक्षा जास्त दर असून, त्यातील २४४ जिल्ह्यांत हाच दर २० टक्के आहे. कर्नाटकमध्ये २७, तमिळनाडूत २४, राजस्थान, ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी १९ टक्के दर आहे. महाराष्ट्रात २० टक्क्यांच्या वर पॉझिटिव्हिटी दर असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या १६ वर आली आहे.
३६ जिल्ह्यांच्या महाराष्ट्रात एकूण पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांच्या खाली आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर हा सर्वात जास्त आहे. १६ मे रोजी राज्यात बरे झालेले रुग्ण होते ५९,३१८ तर नव्या रुग्णांची संख्या ३४,३८९ होती. देशात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये २० टक्क्यांच्या वर पॉझिटिव्हिटी दर असलेला जिल्हा नाही. राज्यातील ७५ जिल्ह्यातील फक्त १४ जिल्ह्यांत हा दर १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
हरयाणा या लहान राज्यात एकूण २२पैकी १६ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांच्या वर आहे. २३ जिल्ह्यांच्या पंजाबमध्ये २१ जिल्ह्यांत हा दर १० टक्क्यांच्या वर उर्वरित जिल्ह्यांत तो २० टक्क्यांच्या पुढे आहे. दिल्लीतील कोविड-१९ रुग्णांची संख्या कमी होत असली तरी तीन जिल्ह्यांत २० टक्क्यांच्या वर, तर आठ जिल्ह्यांत तो १० टक्क्यांच्या वर आहे. केंद्रीय आरोग्य मंंत्रालयातील अधिकृत सुत्रांनी म्हटले की, देशात गेल्या तीन दिवसांत नव्या रुग्णांची संख्या १० टक्क्यांनी कमी झाली असली तरी पॉझिटिव्हिटी दरात घट फार मंद गतीने होत आहे.
१६ जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. भारतात या लसीचे ‘कोविशिल्ड’ या नावाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे उत्पादन करण्यात येते. ही लस दिल्यानंतर काही प्रमाणात दुष्परिणाम जाणवतात. भारतात हे प्रमाण १० लाख डोसमागे ०.६१ असे नगण्य आहे. त्या तुलनेत ब्रिटनमध्ये हे प्रमाण दहा लाख डोसमागे चार असे आहे. जर्मनीमध्ये हे प्रमाण ब्रिटनच्या अडीचपट जास्त आहे. कोव्हॅक्सिन लसीचेही धोकादायक दुष्परिणाम दिसून आले नाहीत. ॲस्ट्राझेनेकाची लस दिल्यानंतर काही जणांमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण झाल्याचे आढळून आले होते. मात्र आशियाई तसेच दक्षिण आशियाई लोकांमध्ये हे प्रमाण सत्तर टक्के कमी आहे. भारतात ही लस ‘कोविशिल्ड’ या नावाने आहे. ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफोर्डने विकसित केलेल्या लसीमुळे रक्तस्राव आणि रक्ताच्या गाठी निर्माण होत असल्याचे आढळले होते. मात्र भारतात हे प्रमाण अतिशय कमी असल्याचे लसीकरण दुष्परिणाम समितीने म्हटले आहे.