coronavirus: भारतात संभाव्य औषधाच्या चाचण्या सुरू, १० रुग्णालयांत परीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 07:43 AM2020-05-13T07:43:20+5:302020-05-13T07:43:45+5:30
सरकारने मान्यता दिलेल्या ग्लेनमार्क कंपनीची घोषणा; जुलै-ऑगस्टपर्यंत चाचण्या होणार पूर्ण
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गाने होणाऱ्या ‘कोविड-१९’ या महाभयंकर आजारावर कदाचित गुणकारी ठरू शकणाºया ‘फॅविपिरावीर’ या औषधाच्या प्रत्यक्ष रुग्णांवरील चाचण्या मंगळवारपासून सुरू करण्यात आल्याचे ‘ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स’ या औषध उत्पादक कंपनीने
जाहीर केले.
मुंबईतील ग्लेनमार्क कंपनीला भारताच्या औषध महानियंत्रकांनी या औषधाच्या ‘कोविड-१९’च्या बाधित रुग्णांवर चाचण्या घेण्याची मान्यता एप्रिलमध्ये दिली. सरकारकडून अशी मान्यता मिळालेली देशातील ही एकमेव औषध कंपनी आहे.
‘फॅविपिरावीर’ हे मूळ औषधीद्रव्य वापरून ‘अॅव्हीगान’ या ब्रँडनेमचे औषध जपानमधील फुजीफिल्म तोयामा केमिकल कंपनी तयार करते. भारतात ते औषध तापावर वापरण्यास २०१४ पासून परवानगी मिळालेली आहे. या औषधाचा बाधितांना देण्यासाठीचा योग्य डोस ग्लेनमार्क कंपनीने तयार केला आहे. या चाचण्या जुलै किंवा आॅगस्टपर्यंत पूर्ण होतील. त्यांच्या निष्कर्षांचा बारकाईने अभ्यास केल्यावर हे औषध कोरोनावर कितपत गुणकारी ठरते, हे स्पष्ट होईल. ग्लेनमार्क कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जेथे कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत, अशा १० सरकारी व खासगी इस्पितळांमध्ये या औषधाच्या प्रत्यक्ष रुग्णांवर चाचण्या घेण्यात येतील.
प्रभावी लस लवकरच; जागतिक आरोग्य संघटनेला विश्वास
च्वॉशिंग्टन : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अवघे जगच संकटात सापडले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सगळे देश धडपडत आहेत. आरोग्य यंत्रणांसमोर मोठी आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे. ‘या विषाणूवर मात करू शकेल, अशी लस तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अपेक्षित वेळेआधीच ती उपलब्ध होऊ शकेल. संशोधकांचे ७ ते ८ गट अशी लस तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत.
च्लवकरच जगाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. असे घडले तर संपूर्ण जगाला मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल टेड्रोस अॅडनॉम यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेला दिली. या कामासाठी अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला. आज संशोधकांचे वेगवेगळे सुमारे १०० गट या लशीच्या चाचण्या करीत आहेत. यातील काही गट अशी लस तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत, असेही त्यांनी सांगितले.