CoronaVirus News: प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण; लष्करी इस्पितळात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 08:37 AM2020-08-11T08:37:00+5:302020-08-11T08:38:38+5:30
माजी राष्ट्रपतींनी ट्विट करून दिली माहिती
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चाचणीतून निष्पन्न झाल्याने सोमवारी त्यांना येथील मुख्य लष्करी इस्पितळात दाखल केले गेले.
स्वत: ही माहिती ट्विटवर देताना ८४ वर्षांच्या मुखर्जी यांनी लिहिले की, एका वैद्यकीय कामासाठी इस्पितळात गेलो असता कोरोनाची चाचणी केली गेली व ती ‘पॉझिटिव्ह’ आली. गेल्या आठवडाभरात जे माझ्या संपर्कात आले त्यांनी स्वत:हून विलगीकरणात राहून स्वत:ची तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
मुखर्जी यांच्या या आजारपणाची माहिती कळताच पक्षभेद बाजूला ठेवून बहुतेक सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी चिंतेची व त्यांना लवकर बरे वाटावे, अशा सदिच्छांचे ट्विट केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी इस्पितळात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.