Coronavirus : कोरोनाच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशाला संबोधित करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 11:33 PM2020-03-18T23:33:04+5:302020-03-19T07:26:13+5:30
कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशाला संबोधित करणार आहेत. गुरुवारी संध्याकाळी 8 वाजता मोदी देशवासीयांशी संवाद साधतील.
कोरोना विषाणूच्या होत असलेल्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर या विषाणूला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत पंतप्रधान देशवासीयांना माहिती देण्याची शक्यता आहे. तसेच कोरोना विषाणू संबंधीच्या बाबी आणि त्यासंबंधीच्या उपायांबाबत चर्चा करतील. दरम्यान, मोदींनी कोरोना विषाणूमुळे उदभवलेल्या परिस्थितीबाबत आढावा बैठकाही घेतल्या आहेत.
Prime Minister Narendra Modi will address the nation on 19th March 2020 at 8 PM, during which he will talk about issues relating to COVID-19 and the efforts to combat it. pic.twitter.com/rH4P4qQwy3
— ANI (@ANI) March 18, 2020
कोरोनामुळे भारतात आतापर्यंत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 150 हून अधिक झाली आहे. दिल्लीपासून केरळपर्यंत पसरलेल्या या रोगानं पश्चिम बंगालमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. चीन, इटली, अमेरिका, इराण, स्पेन आदी देशांत कोरोनाचा कहर सुरू असताना भारतातील परिस्थिती मात्र बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. त्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही समाधान व्यक्त केले आहे. सध्या भारतात दुसऱ्या टप्प्यात कोरोना आहे. म्हणजेच कोरोना व्हायरस संक्रमित असलेल्या देशातून ज्या व्यक्ती भारतात आल्या आहेत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर अनेकांना त्याचा संसर्ग होतो. सध्या भारतात बाहेरून आलेल्या लोकांना कोरोना झाला आहे. मात्र याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.