CoronaVirus: बेसावध राहिल्यास नवे संकट; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रासह काही राज्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 06:38 AM2021-11-04T06:38:08+5:302021-11-04T06:38:29+5:30
CoronaVirus in India:मे महिन्याच्या सुरुवातीला भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येने शिखर गाठले होते. आता भारतात मृतांची संख्या खूपच कमी आहे. भारतातील मृत्यूदर रशिया, अमेरिका आणि ब्रिटनपेक्षाही खूप कमी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील १०० कोटींपेक्षा लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली, हे खरे असले तरी त्याबद्दल समाधान मानून चालणार नाही. आपण बेसावध राहिलो तर भविष्यात नवे संकट उभे राहू शकेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व राज्यांना तसेच सरकारी अधिकाऱ्यांना दिला.
महाराष्ट्रासह काही राज्यांतील सुमारे ४० जिल्ह्यांत लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे. या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, काही राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज बोलून दाखवली.
मोदी म्हणाले की, लसीकरण मोहिमेत आतापर्यंत सरकारी अधिकारी, कर्मचारी व आशा सेविकांमुळे प्रगती झाली आहे. दुर्गम भागातील लोकांना लस देण्यासाठी अनेकदा कर्मचारी मैलोनमैल चालत त्या गावांपर्यंत गेले आहेत. पण, आता बेसावध राहून चालणार नाही.
कोरोनामुळे जगभरात ५० लाख लोकांचा मृत्यू
वॉशिंग्टन : कोविड-१९ च्या सर्वव्यापी साथीत गेल्या दोन वर्षांत जगभरात ५० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. उच्च-मध्यमवर्गीय किंवा उच्च उत्पन्न असलेल्या देशांत जगातील लोकसंख्येपैकी आठवा हिस्सा राहतो; परंतु, कोरोनामुळे जगभरात झालेल्या एकूण मृत्यूपैकी निम्म्या लोकांचा मृत्यू या देशांत झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक ७४०,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
जॉन हॉफकिन्स विद्यापीठाने कोरोना मृतांचा संख्या संकलित केली अहे. पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ओस्लोच्या माहितीनुसार १९५० पासून आजपर्यंत युद्धात जवळपास एवढ्याच लोकांचा मृत्यू झाला आहे, तेवढ्या कोरोनामुळ मरण पावले. हृदयरोग आणि पक्षाघातानंतर जगभरात लोकांचा मृत्यू होण्यामागचे तिसरे मुख्य कारण कोविड-१९ आहे.
भारतात मृत्यूदर कमी
मे महिन्याच्या सुरुवातीला भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येने शिखर गाठले होते. आता भारतात मृतांची संख्या खूपच कमी आहे. भारतातील मृत्यूदर रशिया, अमेरिका आणि ब्रिटनपेक्षाही खूप कमी आहे.