Coronavirus : कर्तव्यनिष्ठा! २२ दिवसांच्या तान्हुल्या बाळासह आयुक्त जी. श्रीजना कर्तव्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 04:17 PM2020-04-12T16:17:25+5:302020-04-12T16:25:14+5:30
Coronavirus : जी. श्रीजना या आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर फक्त 22 दिवसांनी कार्यालयात परतल्या आहेत.
विशाखापट्टणम : देशात कोरोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सरकारकडून विविध योजना करण्यात येत आहेत.
याचबरोबर, या कोरोनाच्या लढ्यात अनेक डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत पोलीस व सरकारी अधिकारी, कर्मचारी खऱ्या अर्थाने कर्तव्य बजावत आहेत. अशाच प्रकारे विशाखापट्टणम महानगरपालिकेच्या (GVMC) आयुक्त जी. श्रीजना कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या लहान मुलासह मैदानात उतरल्या आहेत.
जी. श्रीजना या आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर फक्त 22 दिवसांनी कार्यालयात परतल्या आहेत. जी. श्रीजना यांनी आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांना आपल्या कर्तव्यावर परतावे लागले आहे.
कार्यालयीन कामकाज आणि बाळाजी काळजी कशा प्रकारे घेता असा सवाल जी. श्रीजना यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, "माझे पती वकील आणि आई मला खूप मदत करतात. माझ्या मुलाला दुध पाजता यावे, यासाठी दर चार तासांनी घरी जाते आणि त्यानंतर पुन्हा कामावर परत येते. यावेळी माझे पती आणि आई बाळाची काळजी घेतात."
याचबरोबर, एक जबाबदार आणि प्रमुख अधिकारी म्हणून त्यांनी सांगितले की, "या कठीण काळात कामावर राहाण्याचे महत्त्व मला ठाऊक आहे. या कठीण काळात आपत्कालीन सेवांची किती आवश्यकता आहे, हे सुद्धा माहीत आहे", असे जी. श्रीजना यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासन विषाणूचा धोका रोखण्यासाठी संयुक्त प्रयत्न करीत आहे. तसेच, जीव्हीएमसी स्वच्छतेविषयक कामे, व्हावीत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे जी. श्रीजना यांनी सांगितले. याशिवाय, गरजूंना आवश्यक सुविधा पुरविणे. तसेच, विशाखापट्टनममध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांसोबत सर्व स्तरावर समन्वय साधणे. हाच कामाचा भाग आहे, असे जी. श्रीजना यांनी सांगितले.
दरम्यान, भारतात सुद्धा कोरोनामुळे आतापर्यंत २७३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ८, ३५६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९०९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातच दिलासादायक बाब म्हणजे, या आजारापासून ७१६ रुग्ण बरे झाले आहेत.
जगभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जगभरात १७ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. एक लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतही पाच लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर १२ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.