CoronaVirus: लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार; पण रेल्वे, विमानप्रवास १५ मे नंतरच सुरू होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 02:08 AM2020-04-20T02:08:22+5:302020-04-20T07:18:06+5:30
देशव्यापी लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार असले तरी विमान, रेल्वेप्रवास उशिरा सुरू होण्याची शक्यता
नवी दिल्ली : वाढविलेले देशव्यापी लॉकडाऊन ३ मे रोजी संपले, तरी बंद असलेली रेल्वे व विमानांची प्रवासी वाहतूक किमान १५ मेपर्यंत तरी पुन्हा सुरू होणार नाही, असे संकेत मिळत आहेत.
सूत्रांनुसार संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिगटाच्या शनिवारी सायंकाळीच्या बैठकीत झालेल्या चर्चेत असाच सूर होता. मात्र, लॉकडाऊनमुळे जागोजागी अडकून पडलेल्या लाखो स्थलांतरित मजुरांचे अतोनात हाल झाले असल्याने त्यांना त्यांच्या मूळ राज्यात सोडण्यासाठी तरी लॉकडाऊन संपल्यावर, लगेच विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात, असा विचारही बैठकीत व्यक्त झाला. एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय मार्गांवर १ जूननंतरच्या प्रवासाचे बुकिंग पुन्हा सुरू केले असले, तरी विमान कंपन्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत देशांतर्गत प्रवासाचे कोणतेही बुकिंग सुरू करू नये, असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले आहे.