coronavirus: बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, परवानगीशिवाय औषधाची चाचणी घेतल्याने होणार कायदेशीर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 02:41 PM2020-06-24T14:41:26+5:302020-06-24T14:44:44+5:30
कुठल्याही प्रमाणित वैद्यकीय संस्थेची मान्यता तसेच शासकीय परवानगी न घेता औषध तयार करून प्रसिद्धीस आणल्याने बाबा रामदेव यांनी कोरोनावर आणलेले औषध पहिल्याच दिवशी वादाचा भोवऱ्यात सापडले आहेत.
जयपूर - पतंजली योगपीठाचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव यांना मंगळवारी कोरोनिल हे कोरोनावरील औषध समोर आणून वैद्यकीय जगतामध्ये खळबळ उडवून दिली होती. मात्र कुठल्याही प्रमाणित वैद्यकीय संस्थेची मान्यता तसेच शासकीय परवानगी न घेता हे औषध तयार करून प्रसिद्धीस आणल्याने पहिल्याच दिवशी हे औषध वादाचा भोवऱ्यात सापडले आहेत. आयुष मंत्रालयाने या औषधाच्या जाहीरातीवर बंदी आणलेली असतानाच आता राजस्थान सरकारने कुठल्याही परवानगीशिवाय औषधाची चाचणी घेतल्याने रामदेव बाबांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून न्यायालयात खटला दाखल करण्याचे संकेत दिले आहेत.
रामदेव बाबांनी कोरोनावर औषध शोधल्याचा केलेला दावा हा फ्रॉड असल्याचा आरोप राजस्थान सरकारने केला आहे. याबाबत राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा म्हणाले की, कोरोनाच्या संकटाच्या काळात बाबा रामदेव यांनी ज्याप्रकारे औषध विकण्याचा दावा केला आहे, ती योग्य बाब नाही.
आयुष मंत्रालयाच्या गॅझेट नोटिफिकेशननुसार बाबा रामदेव यांनी आयसीएमआर आणि राजस्थान सरकारकडून कोरोनाच्या कुठल्याही आयु्र्वेदिक औषधाच्या ट्रायलसाठी परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र कुठल्याही परवानगीविना कुठल्याही निकषांविना औषधाची चाचणी घेतली गेली आहे. ही बाब चुकीची आहे, असे रघू शर्मा यांनी सांगितले. या प्रकरणी आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. तसेच आमच्या एका डॉक्टरांनी एक खटला दाखल केला आहे. त्यानुसारसुद्धा कारवाई होई, असे रघू शर्मा यांनी सांगितले.
कोरोनावरील औषधाची क्लिनिकल ट्रायल जयपूरमधील नॅशनल इंस्टिट्युट ऑफ मडिकल सायन्स अँड रिसर्च (निम्स) येथे करण्यात आल्याचे पतंजली रिसर्च फाऊंडेशन ट्रस्टने आयुष मंत्रालयाला सांगितले होते. तसेच आपण सर्व नियमांचे पालन केल्याचा दावा केला होता.
हा दावा खोडून काढताना मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिथे कुठल्याही औषधाची चाचणी घेण्यासाठी आमच्याकडून परवानगी घेण्यात आली नव्हती. तिथे आम्ही जे रुग्ण भरती केले होते त्यांच्यामध्ये कुठलीही लक्षणे दिसून येत नव्हती. कुणालाही ताप, खोकला किंवा गळ्यात खवखव नव्हती. असे सर्व रुग्ण ७ ते १० दिवसांत बरे झाले. तसेच अन्य ठिकाणी ठेवलेले असे रुग्णसुद्धा पुढच्या काही दिवसांत बरे झाले.