Coronavirus:"ओ भाऊ, कुठे जाताय"; महिला कॉन्स्टेबलने 'ज्यांना' अडवलं, ते कोण आहे समजताच भंबेरीच उडाली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 07:26 AM2021-05-21T07:26:57+5:302021-05-21T07:28:53+5:30
महिला कॉन्स्टेबलने जिल्हाधिकारी नकाते यांना विचारले, तुम्ही कुठे जात आहात, घरीच राहा ना, भाई.
भीलवाडा : वस्त्रनगरी भीलवाडामध्ये लॉकडाऊन आहे. पाहणी करण्यासाठी स्व:त जिल्हाधिकारी सायकलवरून फिरत होते. मात्र, गंमत अशी झाली की, सायकलवरून निघालेल्या जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्यात एका महिला कॉन्स्टेबलने अडविले आणि विचारले कुठे निघालाय तुम्ही? राजस्थानच्या भीलवाडातील या घटनेची सध्या चर्चा आहे.
जिल्हाधिकारी शिवप्रसाद एम. नकाते सायकलवरून निघाले. या कालावधीत गुलमंडी परिसरातील ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी निर्मला स्वामींनी टी-शर्ट परिधान केलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना ओळखलेच नाही आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा रस्ता अडवून चौकशी केली. महिला पोलिसाच्या तत्परतेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनाही थांबावेच लागले.
महिला कॉन्स्टेबलने जिल्हाधिकारी नकाते यांना विचारले, तुम्ही कुठे जात आहात, घरीच राहा ना, भाई. तेवढ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मागून येणारा बंदूकधारी कर्मचारी म्हणाला, अहो मॅडम, कुणाला थांबवत आहात... हे जिल्हाधिकारी आहेत. या प्रकारामुळे काही वेळ महिला कॉन्स्टेबल घाबरून गेल्या. परंतु, जिल्हाधिकारी नकाते यांनी महिला कॉन्स्टेबलसोबत घडलेला हा प्रसंग अगदी सहजतेने घेत, त्यांच्या कामाचे कौतुक केले.