Coronavirus: देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वेगाने वाढ; फक्त ४ दिवसात आढळले ‘एवढे’ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 08:39 AM2020-04-03T08:39:36+5:302020-04-03T08:45:37+5:30
कोरोनाग्रस्त काही रुग्णांना बरे करुन घरी सोडण्यात आलं आहे. देशातील २९ राज्यामध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे.
नवी दिल्ली – संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यापासून अनेक लोक याचे शिकार होत आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत भारतात २ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाग्रस्त काही रुग्णांना बरे करुन घरी सोडण्यात आलं आहे. देशातील २९ राज्यामध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. मागील काही दिवसात वाऱ्याच्या वेगाने कोरोना पसरत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ३ होती, १४ मार्च पर्यंत हा आकडा वाढून १०० वर पोहचला. २४ मार्च रोजी कोरोनाबाधितांची सख्या ५०० वर येऊन पोहचली. तर २९ मार्चनंतर कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार झाली तर गेल्या ४ दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजाराने वाढून सध्या २ हजारांवर पोहचली आहे. कोरोना संक्रमणाचा अंदाज लावला तर अवघ्या ४ दिवसांत १ हजार रुग्ण आढळून आल्याने हा व्हायरस किती जलदगतीने भारतात पसरतोय हे दिसून येते.
भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येला तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाला जबाबदार धरण्यात येत आहे. निजामुद्दीन मरकजचं प्रकरण समोर आल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसली. मार्च महिन्यात मरकज येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमात देशातील १९ राज्य आणि परदेशातील १६ देशातील जवळपास ८ ते ९ हजार लोक सहभागी झाल्याचा अंदाज आहे.
कार्यक्रमानंतर लॉकडाऊनपर्यंत मरकज येथे अडीच हजार लोक राहिले तर बाकीचे लोक आपापल्या राज्यात निघून गेले. यातील काही लोकांमध्ये कोरोना संक्रमण आढळलं. तपासणीनंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी मिळाली. आता हे लोक कोणकोणत्या राज्यात गेले, कोणाच्या संपर्कात आलेत या सर्वाचा शोध घेणं मोठं आव्हानात्मक आहे. राज्यात युद्धस्तरावर या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा शोध घेणं सुरु आहे. या लोकांशी संपर्कात आलेल्या आतापर्यंत ९ हजार लोकांना क्वारंटाईन केले आहे.
देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या २० टक्के रुग्ण तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. ५०० पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. हा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. फक्त दिल्लीत कोरोना व्हायरसचे २९३ रुग्ण आढळून आलेत त्यातील १८२ रुग्ण मरकजशी जोडले गेले होते. राजधानी दिल्लीत मरकज येथे गेलेल्या दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. तर देशात मरकजशी जोडलेल्या १९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.