coronavirus: भयावह! गेल्या २४ तासांत देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत रेकॉर्डब्रेक वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 10:47 AM2020-06-26T10:47:01+5:302020-06-26T10:51:29+5:30
गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा प्रचंड वाढ झाली आहे. काल दिवसभरात देशामध्ये कोरोनाचे तब्बल १७ हजार २९६ नवे रुग्ण सापडले आहे. तर देशभरात ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली - लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंग, चाचण्यांमधील वाढ अशा अनेक उपाययोजना केल्यानंतरही भारतातील कोरोनाबाधितांच्या वाढीचा वेग काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा प्रचंड वाढ झाली आहे. काल दिवसभरात देशामध्ये कोरोनाचे तब्बल १७ हजार २९६ नवे रुग्ण सापडले आहे. तर देशभरात ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या चार लाख ९० हजार ४०१ झाली आहे. तर आतापर्यंत देशात १५ हजार ३०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मात्र या सर्वामध्ये दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात १ लाख ८९ हजार ४६३ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार देशात २५ जूनपर्यंत ७७ लाख ७६ हजार २२८ कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर २५ जून रोजी देशभरात कोरोनाच्या २ लाख १५ हजार ४४६ चाचण्या घेण्यात आल्या.
India sees highest single-day spike of 17,296 COVID-19 cases, tally reaches 4,90,401
— ANI Digital (@ani_digital) June 26, 2020
Read @ANI Story | https://t.co/TV18hZZhi4pic.twitter.com/1khdLZ0sy6
कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या महाराष्ट्रामध्ये काल कोरोनाच्या तब्बल ४ हजार ८४१ नव्या रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात राज्यात झालेली रुग्णांची ही सर्वाधिक नोंद आहे. दिवसभरात राज्यात १९२ जणांच्या मृत्यूचीही नोंद झाली. मात्र यामध्ये आधीच्या ८३ मृत्यूंचा समावेश आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १ लाख ४७ हजार ७४१ वर पोहोलची आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे मुंबईमध्ये कोरोना आता नियंत्रणात येण्याची चिन्हे दिसू लागली असून, काल मुंबईत १३५० रुग्णांची नोंद झाली.
दुसरीकडे दिल्लीमध्ये मात्र कोरोनाच्या संसर्गाने वेग घेतला आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीमध्ये कोरोनाच्या ३ हजार ३९० नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या ७४ हजारांच्या जवळ पोहोचली आहे. तर २४ तासांत दिल्लीत ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.
काही दिवसांपूर्वी वाढत्या कोरोनाबाधितांमुळे मुंबईबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता मुंबईतील रुग्णसंख्या स्थिरावली असून, दिल्ली हे देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असलेले शहर ठरले आहे. सध्या मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ७० हजार ८७८ आहे. तर दिल्लीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ७३ हजार ७८० रुग्ण सापडले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या