Coronavirus: मृत्युवरही कोरोनाचं सावट, अंत्यसंस्कार लाईव्ह पाहून नातेवाईकांकडून शोक व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 01:19 PM2020-04-08T13:19:54+5:302020-04-08T13:20:18+5:30
देशात कोरोनामुळे मृत झालेल्या ६३ टक्के रुग्णांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक होते. तसेच ८६ टक्के रुग्णांना मधुमेह, हृदयाचे आजार आणि हायपरटेन्शन यांसारखे आजार होते असं निर्दशनास आले.
वाराणसी - भारतात कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ४,४२१ वर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. मंगळवारी ३५४ नव्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहितीआरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली होती. तसेच आतापर्यत ११४ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचे संकट वाढताना दिसत आहे. या संकटात पावलो-पावली माणूसकीचे दर्शन होत आहे, तर हतबल झालेल्या नागरिकांचे अश्रूही दिसत आहेत.
देशात कोरोनामुळे मृत झालेल्या ६३ टक्के रुग्णांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक होते. तसेच ८६ टक्के रुग्णांना मधुमेह, हृदयाचे आजार आणि हायपरटेन्शन यांसारखे आजार होते असं निर्दशनास आले. मात्र, अद्यापही कोरोनाग्रस्तांच्या मृत्युबद्दल समाजात मोठी भिती पसरली आहे. त्यामुळे, या मृतांच्या अंत्यसंस्कारासाठीही समस्या उद्भवत आहेत. यमुनानगर येथील एका कुटुंबीयांना घरातील व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात सहभागी होता आले नाही. आपल्या घरातील वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारात सहभागी होता न आल्याचे दु:ख या कुटुंबीयांनी तांत्रिक पद्धतीने दूर करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओद्वारे लाईव्ह अंत्यसंस्कार कार्यक्रम पाहून कुंटुंबीय आणि नातेवाईक या अंत्यसंस्कार विधी कार्यक्रमात सहभागी झाले होते.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन असल्याने आपल्या आजीच्या मृत्युचे दु:ख कुटुंबीयांमध्ये असल्याचे शिपु यांनी म्हटले. याबाबत नातेवाईकांना कळवले असता, कोरोनामुळे एकत्र येण्यास कुणीही तयारी दर्शवली नाही. मात्र, आजीच्या मृत्युचं दु:ख संपूर्ण कुटुंबाला होतं. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून अंत्यसंस्कार सोहळा कुटुंब आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचविण्यात आला. नातेवाईकांनीही सोशल मीडियातूनच याबद्दल आपलं दु:ख प्रकट केलं. कोरोनामुळे जिवंत माणसांना संकट आलं असलं, तरी मृतांच्या अंत्यसंस्कावरही कोरोनाचं सावट असल्याचं या घटनेतून दिसून येतंय. दरम्यान, कोरोनाच्या संकटाचा सामना राज्य आणि देश करत असून लॉकडाऊन कालावधी वाढणार असल्याची चर्चा आणि एकंदतरीत परिस्थिती दिसून येत आहे.