Coronavirus: दिलासा! ‘या’ औषधाचा वास घेतल्यानं होईल कोरोनाचा खात्मा; संशोधकांनी केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 01:50 PM2022-02-10T13:50:53+5:302022-02-10T13:51:10+5:30
कोची येथील अमृता रुग्णालयातील डॉक्टर आणि अमृता विश्व विद्यापीठातील स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.
नवी दिल्ली – गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीनं लोकांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी वैज्ञानिकांनी लस विकसित केली. त्यानंतर आता हळूहळू कोरोनावरील उपचारात औषधं बाजारात येऊ लागली आहेत. कोरोना(Coronavirus) उपचारासाठी भारतात झालेल्या एका नव्या स्टडीनं दिलासा मिळणार आहे. कोरोना व्हायरसविरुद्ध नाइट्रिक ऑक्साइड एक यशस्वी आणि किफायतशीर गेम चेंजर उपचार सिद्ध होऊ शकतो.
कोची येथील अमृता रुग्णालयातील डॉक्टर आणि अमृता विश्व विद्यापीठातील स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आणि संशोधकांनी सांगितले की, नाइट्रिक ऑक्साइड वास घेतल्यानं नाकातील कोरोना मारण्यास मदत होते. इंफोक्शियस माइक्रोब्स एँड डिजीज जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. नायट्रिक ऑक्साईडने कोरोना विषाणूचा खात्मा केला. इतकेच नाही तर ते शरीरातील पेशींशी विषाणूच्या प्रभावापासून रोखू शकते असंही संशोधकांना संशोधनात आढळलं.
याआधीही ‘या’ कामात व्हायचा वापर
माहितीनुसार, नाइट्रिक ऑक्साइडचा वापर अनेक वर्षांपासून ब्लू बेबी सिंड्रोम, फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण यासारख्या वैद्यकीय स्थिती असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते.
NBT मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, अमृता स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे प्रोफेसर बिपिन नायर यांनी सांगितले की, NO ला कोविड-19 साठी उपचार पर्याय म्हणून पाहिले पाहिजे. एका स्वीडिश गटाने केलेल्या अभ्यासातून आम्हाला ही कल्पना मिळाली. हा चमत्कारी वायू SARS-Co-2 विषाणूला रोखण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकतो. कारण ते विषाणूच्या स्पाइक प्रोटीनवर थेट परिणाम करणारे बायोकेमिकल बदल घडवून आणतात अशी शिफारस रिपोर्टमध्ये दिली आहे.
‘असा’ झाला अभ्यास
अमृता हॉस्पिटलमधील टीमनं रुग्णांच्या छोट्या गटाचं परीक्षण केले. या कामासाठी निवडलेल्या २५ रुग्णांपैकी १४ जणांना स्टँडर्ड ट्रिटमेंटसोबतच NO ची थेरेपी दिली. तर ११ जणांवर इतर सामान्य प्रोटोकॉलप्रमाणे उपचार करण्यात आले. या निकालात NO थेरेपी दिलेल्या रुग्णांमधील वायरल लोड इतरांच्या तुलनेने खूप कमी झाल्याचं आढळून आले.