CoronaVirus: पंतप्रधानांकडून लॉकडाऊननंतरची तयारी; 'त्या' दोन खास अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 09:21 AM2020-04-27T09:21:12+5:302020-04-27T09:29:15+5:30
पंतप्रधान कार्यालयातल्या दोन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांकडे खास जबाबदाऱ्या
नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेला दुसरा लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा अतिशय गंभीर परिणाम अर्थव्यवस्थेवर झाल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे मोदी सरकारनं लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या विश्वासातल्या अधिकाऱ्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.
पंतप्रधान कार्यालयात काम करणाऱ्या दोन प्रमुख अधिकाऱ्यांना इतर मंत्रालयांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आहेत. लॉकडाऊननंतर मदतकार्यात काहीही त्रुटी राहू नये यासाठी सरकार कामाला लागलं आहे. पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहणाऱ्या तरुण बजाज यांना आर्थिक गोष्टींशी संबंधित मंत्रालयात सचिवपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर पंतप्रधान कार्यालयातले दुसरे अधिकारी ए. के. शर्मा यांना लघु उद्योग मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्त करण्यात आलं आहे. लॉकडाऊननंतरच्या आर्थिक मंदीच्या परिस्थितीशी दोन हात करण्यात या दोन्ही मंत्रालयांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
ए. के. शर्मा २००१ पासून मोदींसोबत काम करत आहे. सध्याच्या घडीला ते मोदींचे सर्वात जुने सहकारी आहेत. मध्यम आणि लघु उद्योगांसाठी लवकरच मोठं पॅकेज देण्यात येणार असल्याचे संकेत मोदींनी काही दिवसांपूर्वीच दिले. हे पॅकेज लागू करण्याची जबाबदारी ए. के. शर्मा यांच्याकडे दिली जाऊ शकते. तर संपूर्ण पॅकेजच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याची कामगिरी तरुण बजाज पार पाडतील.
Preeti Sudan, Secretary of Ministry of Health and Family Welfare gets 3 months extension in service beyond date of her superannuation: Government of India
— ANI (@ANI) April 26, 2020
(file pic) pic.twitter.com/iZiIczUmgT
कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता आरोग्य सचिव प्रिती सुदन यांची निवृत्ती पुढे ढकलण्यात आली आहे. सुदन ३० एप्रिल रोजी निवृत्त होणार होत्या. मात्र त्यांची निवृत्ती ३ महिने पुढे ढकलली गेली आहे. तर ग्रामीण विकास सचिव राजेश भूषण यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात सचिव स्तरावरील विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे सुदन यांच्यानंतर भूषण त्यांच्याकडेच आरोग्य सचिवपद सोपवलं जाण्याची दाट शक्यता आहे.
लॉकडाऊन संपणार की वाढणार?; आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार
'गाड्या सोडा, बसेस लावा पण त्यांची व्यवस्था करा', शिवसेनेचा सरकारला सल्ला
कोरोनामुळे महाराष्ट्रासह सहा राज्ये लॉकडाऊन वाढविण्यास सहमत?